माणूस अंतराळात गेल्यावर राहतो का तरुण?

न्यूयॉर्क : अंतराळ किंवा अंतराळप्रवासाबाबत आजही अनेक प्रवाद अस्तित्वात आहेत. युरी गागरिन या पहिल्या अंतराळवीराच्या प्रवासानंतर आतापर्यंत अनेकांनी अंतराळ प्रवास केलेला असला तरी याबाबतच्या अनेक कल्पना लोकांमध्ये ठाण मांडून आहेत हे विशेष! त्यापैकी एक समज म्हणजे अंतराळात गेल्यावर माणूस तरुणच राहतो हा आहे. या कल्पनेमागील वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेऊया! अंतराळात गेल्यावर माणूस तरुणच राहतो हा समज जरी चुकीचा असला तरी वय वाढण्याची गती थोडी धीमी होते हे खरे आहे. त्यामागे टाईम डिलेशन हे एक मोठे कारण आहे.

याबाबतचा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे तर समजा एकाच प्रकारची दोन घड्याळे आहेत. त्यापैकी एक घड्याळ स्थिर आहे आणि दुसरे समान वेगाने गतीशील आहे. अशा स्थितीत स्थिर घड्याळाच्या तुलनेत दुसरे घड्याळ धीम्या गतीने चालेल. आईन्स्टाईन यांनी आपल्या या सिद्धांताचा प्रयोग अनेक माध्यमांमध्ये केला होता. या सिद्धांतानुसार काळ हा सापेक्ष आहे जो गुरुत्वाकर्षण आणि वेगासारख्या कारकांनी प्रभावित होऊ शकतो. अंतराळात पृथ्वीच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण कमजोर असते किंवा शून्य असते. अशा स्थितीत व उच्च वेगामुळे अंतराळवीरांबाबत काळाची गती थोडी धीमी होते.

हे गुरुत्वाकर्षण टाईम डिलेशनमुळे होते, त्याचा प्रयोग परमाणु घड्याळे आणि मजबूत गुरुत्वाकर्षण क्षेत्रांमध्ये वेगाने जाणार्‍या विमानांद्वारेही करण्यात आला आहे. अंतराळातील असमान परिस्थितींमध्ये मानवी मेंदूही वेगळा व्यवहार करू लागतो. एकीकडे जिथे शरीराचा भार कमी होतो किंवा संपतो, तर दुसरीकडे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूही वेगळे सिग्नल देऊ लागतो. त्याला मेंदूची ‘री-वायरिंग’ ही म्हटले जाते. त्यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर सुरुवातीला उठणे-बसणे, चालणे या क्रिया करताना थोडी अडचण होते. एका अंतराळवीराची तुलना पृथ्वीवरील त्याच्या जुळ्या भावाशीही करण्यात आली होती. त्यामध्ये आढळले की 91.3 टक्के जनुकांमध्येही फरक पडला आहे. अर्थात ते जास्त दिवस टिकत नाही व सहा महिन्यांमध्ये शरीर पुन्हा पूर्ववत होते!