पुणे : बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वबंधुता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार व साहित्यिक ऍड. जयदेव गायकवाड, सिकंदराबाद (तेलंगणा) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ज्येष्ठ सदस्या नलिनी व्यंकटराव पणसा आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील महाविद्यालय यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी पेठेतील एसएम जोशी सभागृहात येत्या १२ एप्रिल २०२४ रोजी आयोजित समारंभामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
प्रकाश रोकडे म्हणाले, “संमेलनामध्ये विविध संस्थांचा सहभाग असून, सकाळी ९ वाजता सभागृहाच्या संविधान कट्ट्यावर बंधुताप्रेमी साहित्यिकांचा आनंद सोहळा होईल. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे, डॉ. विजय ताम्हाणे, मनुद्दीन शेख, मधुश्री ओव्हाळ, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे, डॉ. संजय गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.”
“दुपारच्या सत्रात ‘अभिजात मराठी काव्यपंढरी’मध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग राहील. दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. याप्रसंगी ‘बंधुता काव्यप्रतिभा’, ‘बंधुता शब्दक्रांती’, ‘प्रकाशयात्री’, ‘प्रकाशपर्व’ आणि ‘प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ प्रदान केले जातील. प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुर्के, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. सदाशिव कांबळे आणि डॉ. सहदेव चव्हाण आदी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत,” असेही प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.