राष्ट्रीय शिबिरात महाराष्ट्राच्या सहा महिला खेळाडू – वरिष्ठ स्तरावर हॉकी महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रथमच स्थान; ज्युनियर इंडिया कॅम्पमध्ये आणखी दोघींचा समावेश

1 एप्रिल, 2024, पुणे: हॉकी इंडियाने हॉकी महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची साई केंद्र, बेंगळुरू येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये वैष्णवी फाळके (मिडफिल्डर; सातारा), काजल आटपाडकर (फॉरवर्ड; सातारा), अक्षता ढेकळे (मिडफिल्डर कम डिफेंडर; सातारा), मनश्री शेडगे (मिडफिल्डर; रायगड), ऋतुजा  पिसाळ (फॉरवर्ड; सातारा) आणि भावना खाडे (मिडफिल्डर कम डिफेन्स; हिंगोली) यांचा समावेश आहे.
या सहा खेळाडूंमध्ये हिमांशी गावंडे आणि अश्विनी कोळेकर या दोन खेळाडूंची भर पडली आहे. या दोघींची ज्युनियर इंडिया कॅम्पसाठी आधीच निवड झाली होती.
आठवडाभर चालणारे शिबिर (1 ते 7 एप्रिल) खेळाडूंचे कौशल्य आणि मनोबल वाढवण्यासाठी आहे.
हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष, कृष्णा प्रकाश म्हणाले, “राष्ट्रीय शिबिरात निवड होणे, हा हॉकी महाराष्ट्रासाठी एक मोठा क्षण आहे. खेळाडूंनी मोठी प्रगती करण्याच्या उद्देशाने केलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यातून दिसतात. मला अत्यंत आनंद होत आहे की हॉकी महाराष्ट्रकडे एक अशी संघटना म्हणून पाहिले जात आहे जिथे संभाव्य सर्वोत्तम खेळाडूंचे टॅलेन्ट आहे.”
निवडलेल्या सहापैकी, वैष्णवी, अक्षदा आणि रुतुजा यांनी अनेक प्रसंगी सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भावना, काजल आणि मनश्री भारताच्या वरिष्ठ शिबिरार्थी असून भारताच्या ज्युनियर संघाकडून खेळल्या आहेत.
हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे म्हणाले, “निवड झालेले खेळाडू हे संघटनेच्या मूलभूत प्रयत्नाचे परिणाम आहेत. तळागाळातील विकासात ते आणखी वाढवण्याची आमची योजना आहे.”
मनीष आनंद, हॉकी महाराष्ट्र, सरचिटणीस, पुढे म्हणाले, “महिला हॉकीसाठी ही चांगली बातमी आहे. हॉकी महाराष्ट्राची दोन वर्षातील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यात सलग दोन सिनियर महिला राष्ट्रीय उपविजेतेपदांचा समावेश आहे. हीच वचनबद्ध दृष्टिकोनाची साक्ष आहे.”