राजस्‍थानच्या सीकर जिल्ह्यात झाला भीषण अपघात

राजस्‍थान 14 एप्रिल, 2024: राजस्‍थानमध्‍ये आज सीकर जिल्ह्यात झालेल्‍या भीषण अपघातात कारमधील दोन मुले, तीन महिलांसह सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. ही दुर्घटना फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर घडली.

पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की,फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर कारने पाठीमागून ट्रकला धडक दिली. अपघातानंतर कारने पेट घेतला ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच आगीने कारला कवेत घेतले. कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.कारमधील सर्व लोक मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सालासर बालाजी मंदिराकडून हिसारकडे जात होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारमधील मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही.