तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजावे डॉ. सदानंद मोरे यांचे मत; वंदे मातरम् संघटनेतर्फे ‘देशभक्ती पुरस्कार’ वितरण

पुणे : “कोणताही काळ असला तरी देशभक्ती या मूल्याचे महत्त्व कायम असते. तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजायला हवे. आजची तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होत आहे. ते काही वाईट नाही; पण पक्षनिरपेक्ष समाजकार्य करणारे तरुण समाजासाठी मोलाचे आहेत,” असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

‘वंदे मातरम्’ संघटनेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘देशभक्ती पुरस्कार’ वितरण सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावसकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, लेखक शरद तांदळे, खेळाडू अनिल मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जावेद खान, उद्योजक राहुल पापळ यांना ‘व्यर्थ ना हो बलिदान देशभक्ती पुरस्कार’ आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांना ‘विशेष सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, विकास हांडे, ऍड. चंद्रकांत घाणेकर, राजेश शर्मा, महेश बाटले, झहीर मुलानी, शीतल नलावडे, मोहित काकडे, सुरज जाधव, लेशपाल जवळगे, संचित कर्वे, राज घाटे आदी उपस्थित होते. शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या स्मरणार्थ अलका चौक ते स. प. महाविद्यालय मशाल रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

भूषण गोखले म्हणाले, ‘‘सैन्यात कोणताही जात-धर्म नसतो. तिथे केवळ ‘भारतीय’ हाच एक धर्म असतो. आपल्या सैन्याला संरक्षण सेना म्हणू नका, तर सशस्त्र सेना म्हणा, असा माझा आग्रह असतो. आपला देश पुढे नेण्याची जबाबदारी आता तरुणांच्या खांद्यांवर आहे.’’

रेणू गावसकर म्हणाल्या, ‘‘मूल होणे आणि आपल्यातील लहान मूल जागे ठेवणे, या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी आहेत. पण ज्या वयात मुलांनी खेळायचे-बागडायचे, त्या वयात लहान मुले आपल्या अस्तित्वासाठी झगडताना पाहून मला अतिशय वाईट वाटले होते. माझ्या कामाची प्रेरणा मला आईने दिली होती.’’

श्रीराम पवार म्हणाले, “भगतसिंग यांनी सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये सांगितली. आज त्याची उजळणी करण्याची वेळ आली आहे. आज भारतीयांमधील वैविध्य कमी करण्याचा तसेच सगळ्यांना एकाच मापात बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला नाकारणे म्हणजेच भगतसिंग यांचा आदर्श घेणे आहे.” 

अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, ‘‘भगतसिंग साम्यवादी विचारसरणीचे आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचे होते. मी देव मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. केवळ फाशीवर गेले म्हणून नाही, तर त्यांनी जे विचार मांडले त्यामुळे ते क्रांतिकारक ठरले.’’

प्रास्ताविकात सचिन जामगे म्हणाले, “यापुढील काळातील लढा जातीसाठी नसून, मातीसाठी आहे. त्यामुळे तरुणांनी मातीसाठी एकत्र यावे. भविष्यात महासत्ता व्हायचे असेल, तर देश म्हणून पुढे जावे लागेल. तिथे जातीधर्म टिकणार नाही.”