पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरतर्फे (आयसीएआय) गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. डिसेंबर २०२३ च्या सीएमए परीक्षेत गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांसह वर्षभरात फायनल, इंटरमीडिएट व फाउंडेशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये फायनल ४०, इंटरमीडिएट ११८ व फाउंडेशनच्या २२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या अधिष्ठाता डॉ. अंजली साने यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले. यावेळी टाटा मोटर्स लिमिटेडच्या सप्लाय चैन फायनान्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सीएमए गोपाल भुतडा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, उपाध्यक्ष सीएमए नीलेश केकाण, सचिव सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, खजिनदार सीएमए राहुल चिंचोलकर, कोचिंग कमिटी चेअरमन सीएमए हिमांशू दवे, स्टुडंट कॉर्डीनेशन कमिटी चेअरमन सीएमए अमेय टिकले आदी उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त ‘सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन’ यावर झालेल्या चर्चासत्रात भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या चेअरपर्सन सीए डॉ. रेवती पैठणकर, निवांत अंध मुक्त निवासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपसचिव निवेदिता एकबोटे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ वित्त महाव्यवस्थापक सीएमए लिली शुक्ला यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे संयोजन सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए अनुजा दाभाडे व सीएमए नेहा धारूरकर यांनी केले.
डॉ. अंजली साने यांनी विद्यार्थ्यांना कल्पकता, नाविन्यता व नवकौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला दिला. नीरज जोशी यांनी सीएमए साठी असलेल्या संधी, इन्स्टिट्यूट राबवले जाणारे उपक्रम याविषयी सांगितले. अमित आपटे यांनी प्रात्यक्षिक ज्ञान, नेटवर्किंग व संवादकौशल्याचे महत्व विशद केले. गोपाल भुतडा यांनी औद्योगिक क्षेत्रातील सीएमएची भूमिका सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. अनेकांचा प्रवास ऐकताना उपस्थितांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.