दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं काय प्रकरण आहे ?

नवी दिल्लीः तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. कथित दारु घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.

 

 

उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या घराची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षाही अधिककाळ चौकशी करण्यात आली.

केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून त्यांना दहाव्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने याच प्रकरणात केजरीवालांना दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर सायंकाळी ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन धडकले. केजरीवाल यांच्या उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ‘ईडी’च्या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात सह संचालक कपिल राज तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कार्यकर्ते, नेते जमले
‘ईडी’चे पथक केजरीवालांच्या घरी पोहोचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ‘आप’ चे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले होते. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांना अटक करण्याच्या हेतूने ‘ईडी’चे पथक आले असल्याचा आरोप केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर समाजमाध्यमांतून टीका केली.

त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.