महाराष्ट्र सलग दुसर्‍यांदा फायनलमध्ये – 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा;गतविजेता मध्य प्रदेशवर पिछाडीवरून 2-1 अशी मात

पुणे, 22 मार्च 2024: यजमान महाराष्ट्राने रंगतदार लढतीत पिछाडीवरून गतविजेता मध्य प्रदेशवर 2-1 अशी मात करताना 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची गाठ हरयाणाशी पडेल.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसर्‍या सामन्यात शुक्रवारी कमालीची चुरस पाहायला मिळाली.

सामन्यातील शेवटची 8 मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्र 0-1 असा पिछाडीवर होता. मात्र, सहा मिनिटांमध्ये दोन गोल करताना यजमानांनी नेत्रदीपक विजय मिळवला. 52व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आकांक्षा सिंगने महाराष्ट्राला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर 55व्या मिनिटाला काजल आटपाडकरने केलेला मैदानी गोल निर्णायक ठरला.

तत्पूर्वी, 28व्या मिनिटाला हृतिका सिंगने मध्य प्रदेशला आघाडीवर नेले. मात्र, त्यांना आघाडी राखता आली नाही.

अंतिम फेरीत शनिवारी (23 मार्च) महाराष्ट्रासमोर हरयाणाचे आव्हान आहे. पहिल्याउपांत्य लढतीत पाच वेळचा उपविजेता हरयाणाने झारखंडवर 4-0 असा विजय मिळवला. राष्ट्रीय स्पर्धेत फायनल प्रवेशाची त्यांची ही सहावी वेळ आहे.

निकाल – उपांत्य फेरी 2: हॉकी महाराष्ट्र:2( आकांक्षा सिंग 42व्या मिनिटाला-पीसी, काजल आटपाडकर 55व्या मिनिटाला) वि. हॉकी मध्य प्रदेश 1(हृतिका सिंग 28व्या मिनिटाला-पीसी). हाफटाईम: 1-0