लोकशाहीमध्ये विरोधकही सक्षम असावाच लागतो

पुणे: लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना सारखेच महत्त्व आहे. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठीचे काम विरोधी पक्ष करतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांइतकाच विरोधी पक्ष सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मोदी सरकारने चारशे पारची घोषणा करून विरोधी पक्षच ठेवायचा नाही, असा चंग बांधला आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक असून, विरोधकांना स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याचा चुकीचा पायंडा सत्ताधाऱ्यांकडून पाडला जात आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी मांडले.

मागील काही वर्षांपासून ईडी, सीडीचा वापर करून विरोधकांना पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्याचा नवा पायंडा भाजपने सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडली. आता नव्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पक्षामध्ये समाविष्ट करून विरोधकच संपविण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. एकहाती सत्ता असली पाहिजे. मात्र, पाशवी बहुमत मिळाले, तर लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असते, असा राजकीय तज्ज्ञांचा अभ्यास आहे. मागील २०१४ पासूनची परिस्थिती पाहता राज्यामध्ये बेरोजगारी, महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. कोरोनामध्ये अनेकांच्या हाताचे काम गेले, हाताला काम नाही, त्यामुळे तरुणवर्ग हताश झाला आहे. राज्यातले उद्योग पळवले जात आहेत, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. तिकीट कोणाला द्यायचे, सक्षम उमेदवार निवडायचा, अशी चाचपणी सर्वच पक्षांकडून सुरू आहे. अर्धेअधिक तिकीट वाटप झाले आहे. आजच्यासारखी राजकीय परिस्थिती आतापर्यंत कधीच आली नव्हती. स्वर्गीय राजीव गांधी यांना स्पष्ट बहुमत होते, त्यांनी आजच्या राजकारण्यांसारखा आततायीपणा केला नाही. लोकहिताचा विचार करून विरोधकांना विश्वासात घेत राज्य कारभार केला. भविष्याचा विचार करून अनेक चांगले निर्णय घेतले, त्याची साक्ष आजही सामान्य जनता देत आहे. आजचे राजकारणी त्यातून काही बोध घेतील का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारराजाने सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.