हॉकी महाराष्ट्र सेमीफायनलमध्ये – 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा; हॉकी मणिपूरवर २-१ विजय

पुणे, मार्च: रंगतदार सामन्यात हॉकी मणिपूरवर २-१ असा विजय मिळवत यजमान हॉकी महाराष्ट्रने १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळ उंचावताना यजमानांनी आगेकूच केली. वास्तविक पाहता हॉकी महाराष्ट्रने पहिल्या हाफमध्ये वर्चस्व राखताना पाच पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र त्याचे गोलांमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यामुळे हाफ टाइमपर्यंत गोलफलक कोरा होता.
विश्रांतीच्या दोन मिनिटांनंतर प्रियंका वानखेडेने गोलरक्षक खरीबम बिचू देवीला मागे टाकत हॉकी महाराष्ट्रला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
13 मिनिटांनंतर प्रियांका वानखेडे पुन्हा सुरेख चाल रचताना यजमानांची आघाडी वाढवली. यावेळी सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल झाला.
सामन्याच्या उत्तरार्धात, हॉकी मणिपूरकडून लिली चानू मायेंगबम हिने (60व्या मिनिटाला) आघाडी कमी केली. मात्र, महाराष्ट्राला आघाडी राखण्यात यश आले.
यजमानांआधी हॉकी हरयाणा, हॉकी झारखंड आणि हॉकी मध्य प्रदेश यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीत महाराष्ट्राची गाठ हॉकी झारखंडशी पडेल. दोन्ही सेमीफायनल शुक्रवारी होतील.
सेमीफायनल लाइन अप
उपांत्य फेरी 1: हॉकी मध्य प्रदेश वि. हॉकी हरियाणा
उपांत्य फेरी 2: हॉकी झारखंड वि. हॉकी महाराष्ट्र