कार्बनमुक्त, अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर

पुणे : “प्रगत तंत्रज्ञान, इनोव्हेशनच्या साहाय्याने शाश्वत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती होत आहे. रस्त्यांचा दर्जा उंचावत आहे. ईलेक्ट्रीकल व्हेईकल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असून, त्यासाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात कार्बनमुक्त व अपघाताविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे,” असे मत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी व्यक्त केले.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएई) इंडिया आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणाऱ्या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’वर चर्चासत्राचे आयोजन केले होते. होमियोपॅथ व काऊन्सलर डॉ. मीनल सोहोनी, ‘एआरएआय’च्या उपसंचालिका उज्ज्वला कार्ले, फोर्स मोटर्सचे डॉ. बाळासाहेब शिंदे, सागे इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीचे महेश शिंदे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.

कर्वे रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी व्हेक्टर इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे संचालक एन. पी. वाघ, ‘एआयएसएसएमएस’ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश वाघमारे, स्पेक्ट्राटेकचे संचालक केशव ताम्हणकर, ‘एसएई’ वेस्टर्न सेक्शनचे सदस्य प्रकाश सरदेसाई व संजय निबंधे, कार्यकारी संचालक रमेश पसरीजा, सहायक संचालक मोहन पाटील, व्यवस्थापक परेश शितोळे, सागर मुरुगकर व ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘एसएई’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.

डॉ. रेजी मथाई म्हणाले, “दळणवळण अधिक सक्षम होण्यासाठी ‘व्हिजन झिरो’ आणि ‘नेट झिरो’ संकल्पना राबविण्यात येत आहे. वाहतुकीसंबंधी नियमावली करण्यासह चार्जर, बॅटरी यामध्ये इंनोव्हेशन सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअरचा वापर वाढवून कार्बनमुक्त व अपघातमुक्त वाहतूक कशी बनवता येईल, या दृष्टीने विचारविनियम केला जात असून, त्या पद्धतीची धोरणे आपल्याला बनवावी लागतील. त्याचप्रमाणे २०२५ मध्ये ‘ई-२०’ ची अंबलबजावणी होणार आहे. हायड्रोजन इंधन वाढवण्यावर भर दिला जात आहे. जागतिक स्तरावर लागू होईल, अशा पद्धतीची नियमावली तयार केली जात आहे.”

डॉ. मीनल सोहोनी यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे, याचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. कार्यक्षमता वाढविण्यासाठी मनशांती गरजेची असून, कामाच्या धबडग्यातून स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. योग्य व्यायाम, प्राणायाम याचे महत्व अधोरेखित केले. प्रा. डॉ. अविनाश वाघमारे यांनी ‘एसएई’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांविषयीची माहिती दिली. रमेश पसरीजा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अनिता वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. एन. पी. वाघ यांनी आभार मानले.