पुणे, फेब्रुवारी २०२४: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण एमआयडीसी येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, गणेश निबे, पोलीस उप अधीक्षक शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य आणि देश घडविला. त्यांनी देशाचे संरक्षण कसे करावे हे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या जयंतीदिनी संरक्षण क्षेत्रातील निर्मितीचे नवे दालन साकार होत असल्याचा आनंद आहे. पुणे जिल्हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो‘चे आयोजन करण्यात आले आहे. या भूमीतून भारतीय संरक्षण दलाला शक्तीशाली आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहील असा संकल्प करू या, असे आवाहन त्यांनी केले.
एमएसएमई उद्योगांचे संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान-संरक्षण राज्यमंत्री अजय भट म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्या संरक्षण सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे. पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून श्री.भट यांनी महाराजांना अभिवादन केले.
प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदल कटिबद्ध असल्याचे सांगून ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष २०४७ पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
श्री.निबे यांनी प्रास्ताविकात नव्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात निबे डिफेन्स प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.