ईडीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागला आहे. आम्हाला त्रास देणारे यापैकी कोणीही एससी किंवा एसटी समाजातील नाही. त्यामुळे ईडीच्या चार नावाजलेल्या अधिकाऱ्याविरोधात तसेच अज्ञात अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एसटी-एससी पोलिस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांना पाठवली आहे. मुख्यमंत्री यांच्या या पत्राची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हाही नोंदविला आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजधानी रांचीच्या एसटी – एससी पोलिस ठाण्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला. यामध्ये रांची झोनल ऑफिसच्या चार अधिकाऱ्यांची नावे आहेत. कपिल राज, देवव्रत झा, अनुपम कुमार आणि अमन पटेल या चार अधिकाऱ्यांसह काही अज्ञात अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
हेमंत सोरेन यांनी बुधवारी 31 जानेवारी रोजी एसटी-एससी पोलिस स्टेशनला पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 30 जानेवारीला जेव्हा रांचीला पोहोचले तेव्हा काही इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियावरून कळले की काही ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्याच्या समाजाला त्रास देण्यासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी नवी दिल्लीतील झारखंड भवन आणि 5/01, शांती निकेतन येथील निवासस्थानी छापे टाकले.
27 आणि 28 जानेवारीला नवी दिल्लीला गेले होते. यावेळी ते त्यांच्या ५/१ शांती निकेतन येथील शासकीय निवासस्थानी राहिले. 29 जानेवारी रोजी वरील अधिकाऱ्यांसह इतर काही अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानी पोहोचून झडती घेतल्याचे त्यांना समजले. याबाबत मला माहिती देण्यात आली नाही. हेमंत सोरेन यांनी पुढे असे म्हटले आहे की, याच अधिकाऱ्यांनी मला सांगितले होते की त्यांना 29 ते 31 जानेवारी दरम्यान रांचीमध्ये माझी चौकशी करायची आहे.
Crime News :‘त्या’ खुनाचा 12 तासांत उलगडा; मित्राच्या मदतीने पतीचा घात
झारखंडमधील राष्ट्रीय, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या बातम्यांची माहिती याच अधिकाऱ्यांनी दिली असावी. माझ्या समजुतीनुसार सर्वसामान्यांच्या नजरेत माझी बदनामी करणे हाच त्यांचा उद्देश आहे. एवढेच नाही तर 30 जानेवारीला मला मीडिया रिपोर्ट्सवरून कळले की याच लोकांनी माझ्या दिल्लीतील निवासस्थानातून निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार जप्त केल्याची खोटी बातमी पसरवली होती. तसेच, रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचेही सांगितले, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे.
ईडी ज्या बीएमडब्ल्यू कारबद्दल बोलत आहे ती निळी कार माझी नाही असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केलं आहे. माझ्याकडे कोणताही अवैध पैसा नाही. वरील चार लोकांसह काही अज्ञात लोकांनी जे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे नाहीत त्यांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे सदस्य आणि साहिबगंज विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून या ईडी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या या लेखी तक्रारीनंतर एसटी-एससी पोलिस ठाण्यात एससी/एसटी (पीए) कायद्यान्वये गुन्हा (क्रमांक 6/24) नोंदवण्यात आला. गोंडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक कुमार राय यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.