बारामती : बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ (Video) यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे हा आरोपी पिडीतेचा सख्खा मावस भाऊ आहे. पिडीत विद्यार्थीनी बारामती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. याबाबत त्या मुलीच्या मैत्रिणींनी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांच्याशी संपर्क साधला. टिंगरे यांनी संपूर्ण प्रकरण पाहून तात्काळ बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरवातीला करण्यात आल. परंतु त्याने मोबाईल स्विच ऑफ ठेवला.
त्यानंतर पोलीसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. पण आरोपी सकाळी सात पासून मुलीला ब्लॅकमेल करून भेटायला बोलवत होता.त्यानंतर घाबरलेल्या मुलीसोबतच्या मैत्रिणीनीं, सामाजिक कार्यकर्ते टिंगरे यांनी प्लॅन केला. त्या आरोपीला मुलगी घाबरली आहे , ती भेटायला तयार असल्याचे भासवले. त्यावर आरोपीने तिला शाहू हायस्कुल समोर भेटायला बोलावले. तसेच परत पुढे पाटस रस्ता येथे आरोपीने येण्यास सांगितले. यावेळी शहर पोलीस चे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मदत मागण्यात आली.
त्यानंतर त्यावेळी अवघ्या दहा मिनिटाच्या आत गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी हजर झाले. सर्वांनी मिळून आरोपी पर्यंत पोहचून आरोपीला ताब्यात घेतले.त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपी हा मुलीचा सख्खा मावस भाऊ निघाला. दरम्यान मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत तिने तक्रार करू नये म्हणून दाबाब आणण्यात आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान या घटनेतील पिडीत मुलीच्या मैत्रीणींचे धाडस आणि सतर्कता ही महत्वाची ठरली. अडचणीत असलेल्या मैत्रिणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी या मैत्रीणी स्वतःच्या आई वडिलांना खोटं बोलून बाहेर पडल्या. दोन दिवस वडापाव खाऊन शेवटी आरोपी मिळवायला मदत केली.
या मुलींच्या मदतीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी त्यांचा सत्कार केला. मुलीच्या मैत्रिणी, सामाजिक कार्यकर्ते, व पोलिसांच्या कर्तव्यामुळे मोठा गुन्हा टळला. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.