Reshuffle In Congress : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी आपल्या संघटनेत मोठा बदल करत 12 सरचिटणीस आणि 12 राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. आता प्रियांका गांधी यांच्याकडे कोणत्याही राज्याची जबाबदारी नाही. त्याचबरोबर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना छत्तीसगडचे प्रभारी आणि सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. कुमारी सैलजा यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश चेनिथल्ला यांना महाराष्ट्राचे प्रभारी आणि मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर सुखजिंदर सिंग रंधावा राजस्थानचे प्रभारी राहतील. रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडून मध्य प्रदेशची जबाबदारी परत घेण्यात आली असून, आता ते फक्त कर्नाटकचेच प्रभारीपद सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी जितेंद्र सिंह यांना मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. सिंह हे आधीच आसामच्या प्रभारी म्हणून भूमिका बजावत आहेत.
Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…
वेणुगोपाल हे संघटनेचे सरचिटणीस म्हणून कायम राहतील तर सरचिटणीस जयराम रमेश हे पक्षाच्या संपर्क विभागाचे प्रभारी म्हणून पाहतील. तर अजय माकन हे पक्षाच्या खजिनदारपदी कायम राहणार आहेत. त्यांच्यासोबत मिलिंद देवरा आणि विजय इंदर सिंघला या दोन नेत्यांना सह खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये एच. के. पाटील मंत्री झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद रिक्त होतं. यानंतर आता रिक्त पदावर रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी चेन्नीथल्ला प्रभारी म्हणून काम पाहतील.