ठाणे | इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. आणि याच टीमने 24 तासाच्या आत अश्वजीतसह आणखी दोघांना अटक केली. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आज त्या तिघांना ठाणे न्यायालयात हजर करणार आहे.
अश्वजित गायकवाड हा राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा असून प्रिया सिंग ही एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तसेच व्यावसायिक ब्यूटीशियन आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाने अश्वजितवर अनेक आरोप केले आहेत. अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. त्या ठिकाणी मला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच माझ्या डाव्या हाताचा चावादेखीव घेतला. आणि आपल्या अंगावर कार घातली, असा आरोप प्रियाने केला. तिची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाण्यातील खासगी रुग्णालयात रविवारी आले होते.
प्रियाने आपल्या पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, आणि सागर शेळके आणि त्याचा ड्रायव्हर शिवा यांची नावे घेतली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना टॅग केले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अश्वजित याची चौकशी करण्यात आली
मात्र पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्याात आले होते. अश्वजित विरोधात पोलिस जी कारवाई करत आहेत, त्याने आपण खुश नसल्याचे प्रियाने म्हटले होते. यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. अखेर रविवारी एसआयटी टीमने कारवाई करत अश्वजित याच्यासह त्याचे साथीदार रोमिल आणि सागर यांना अटक केली.
पोलिसांनी अटकेची ही कारवाई करताना ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तेथे असलेल्या दोन्ही कारही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी रेंज रोव्हर आणि स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. या प्रकरणात कासारवडवली पोलीस स्टेशनमधील अधिकारी सखोल चौकशी करत आहेत.