पिंपरी । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवून वर्षभर झाले. उमेदवार निश्चितीसुद्धा झालेली आहे. मात्र, त्यांना रुजू करून घेण्यास प्रशासकीय दिरंगाई होत आहे. याबाबत संबंधित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ रुजू करून घ्यावे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचे म्हटले आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाकाजावर प्रचंड ताण असून, मनुष्यबळ भरती अपरिहार्य आहे. राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी परीक्षा घेतली होती. त्यासाठी राज्यभरातून ८५ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.
महापालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गातील रिक्त जागांसाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवली आहे. त्याची परीक्षा झाली असून, उमेदवारांना नियुक्ती देणे प्रलंबित आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप ही कार्यवाही पूर्ण केलेली नाही. याबाबत विधीमंडळ अधिवेशनामध्ये मुद्दा मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अर्ज दिला आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Mahesh Landge : नागपूर हिवाळी अधिवेशन : आमदार महेश लांडगे यांचा सडेतोड सवाल
महापालिका प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, मनुष्यबळाचा अभाव यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. गतीमान कारभार चालवण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ रुजू करुन घेणेबाबत कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे. मात्र, दप्तरदिरंगाई सुरू आहे. याबाबत अधिवेशनात मुद्दा मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना वेळ मागितली आहे.
-महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.