‘सिंपल स्टेप्स’तर्फे आयोजित ‘एजलेस वंडर्स – वॉक अँड जॉग’ या अनोख्या उपक्रमाचे चौथे पर्व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिरव्यागार परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विशेष उपक्रमात विविध वयोगटांतल्या ४०० ते ४५० ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला आणि निरोगी जीवनशैलीचा जल्लोष साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात संगीताच्या तालावर जोशपूर्ण वॉर्म-अपने झाली. त्यानंतर सकाळी सव्वा सात वाजता छत्रपती पुरस्कार विजेते श्री. अरुण दातार आणि ‘हाफ आयर्न मॅन’ पूर्ण करणारे सर्वात वयोवृद्ध भारतीय श्री. नवनाथ झांजुर्णे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला. ६० ते ९१ वर्षे वयोगटातील धावपटूंनी मोठ्या आत्मविश्वासाने ३ कि.मी. (फन रन), ५ कि.मी. आणि १० कि.मी. अंतर पार केले. ५ कि.मी. आणि १० कि.मी. या स्पर्धात्मक गटातल्या पहिल्या ३ विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाला मान्यवरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सुप्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता श्रीरंग गोडबोले, तसेच ज्येष्ठ चित्रकार आणि ‘चिंटू’ या लोकप्रिय पात्राचे निर्माते चारुहास पंडित यांसारख्या मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत सहभागींचा उत्साह वाढवला.
ख्यातनाम धावपटू आणि ‘६० दिवस ६० मॅरेथॉन’चा गिनीज विक्रम करणारे अशिष कासोदेकर यांच्या मार्गदर्शनामुळे या कार्यक्रमाला विशेष प्रेरणा मिळाली. स्पर्धेच्या संपूर्ण वेळेत ‘सिंपल स्टेप्स’च्या स्वयंसेवकांनी सहभागींना मोलाची मदत केली. शर्यतीदरम्यान आणि मार्गावर ठिकठिकाणी त्यांची उपस्थिती होती, त्यामुळे सहभागी पूर्ण आत्मविश्वासाने आणि आनंदाने शर्यत पूर्ण करू शकले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम अधिक संस्मरणीय ठरला.
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागींनी स्वादिष्ट नाश्त्याचा आनंद घेतला आणि ‘फिनिशर’ म्हणून फोटो काढताना अभिमान व समाधान यांचा अनोखा संगम अनुभवला. या सोहळ्यात संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भारलेले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांनी या जेष्ठ धावपटूंना भरभरून शुभेच्छा आणि दाद दिली. ही सकाळ सर्व सहभागींसाठी व उपस्थितांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरली.
या उपक्रमाला बी.यू. भंडारी मोटर्स , मोतीलाल धूत इन्फ्रास्ट्रक्चर, डॉयच्च बँक, कॅफे गुड लक आणि GenS अॅप यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. “निरोगी राहू, तंदुरुस्त राहू – आनंदाच्या वाटेवर सहज चालत राहू!” या संकल्पनेसह हा सोहळा फिटनेस आणि आनंदाचा एक प्रेरणादायी अनुभव ठरला.