समर्थ रामदास स्वामी यांची मार्गदर्शक तत्त्वे ‌‘समर्थ नेतृत्व‌’ पुस्तकाद्वारे सामान्यांना कळतील : डॉ. विजय लाड

माधव किल्लेदार लिखित पुस्तकाचे प्रकाशन

\विहित कर्मे न सोडता वैराग्यवृत्ती अंत:करणात असली पाहिजे ही समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण आहे. फक्त जपाची माळ ओढू नका तर वेळप्रसंगी नाठाळाचे माथी काठी मारावी असा क्रांतिकारी विचारही त्यांनी दिला आहे. समर्थ रामदास स्वामींनी चारित्र्य निर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यांनी शिकविलेली 26 सूत्रे माधव किल्लेदार यांनी ‌‘समर्थ नेतृत्व‌’ या पुस्तकात कथा रूपाने मांडली आहेत. समर्थांची मार्गदर्शक तत्त्वे सामान्यांच्या मनात उतरविण्याचे कार्य या पुस्तकाद्वारे घडेल, असा विश्वास दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केला.

सह्याद्री शिखर श्रीरामदास स्वामी पादुका संस्थान ट्रस्ट, महाबळेश्वर मठातर्फे माधव श्रीकांत किल्लेदार लिखित ‌‘समर्थ नेतृत्व‌’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. लाड यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिरीष लिमये होते तर सह्याद्री शिखर श्री रामदास स्वामी पादुका संस्थान ट्रस्टचे सदस्य श्रीराम सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. वेद शास्त्रोत्तेजक सभा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समर्थ रामदास स्वामी यांनी मार्गदर्शन केलेल्या 26 सूत्रांचा गुढार्थ सहज सोप्या शब्दात गोष्टी रूपाने ‌‘समर्थ नेतृत्व‌’ या पुस्तकाद्वारे उलगडून दाखविण्यात आला आहे.

पुस्तकाद्वारे मांडण्यात आलेली सूत्रे मुलोगामी असली तरी आजही उपयुक्त आहेत, असे नमूद करून डॉ. लाड म्हणाले, समर्थ नेतृत्व म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाचे स्मरण ठेवणे अशी शिकवणही या पुस्तकाद्वारे देण्यात आली आहे.

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. लिमये म्हणाले, समर्थ नेतृत्व करताना चारित्र्यसंपन्न असणे अतिशय आवश्यक आहे. इंद्रियांवर मनाचा आणि मनावर बुद्धीचा लगाम असणारी व्यक्तीच समर्थ नेतृत्व करू शकते, अशी शिकवण देणाऱ्या समर्थ रामदास यांनी आध्यात्मिक राहूनही नेतृत्व करता येते हे सूत्र समाजापुढे आणले. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने कीर्तीरूपी शरीराला सांभाळावे, सतत कार्यमग्न रहावे, अलिप्ततेतून संलग्नता साधावी, नम्र आणि कृतज्ञ असावे अशी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण या पुस्तकातून वाचावयास मिळते.

श्रीराम सबनीस यांनी नेतृत्व गुणाची महती सांगून हा गुण दूरदृष्टी देण्याचे कार्य करतो असे नमूद केले.
पुस्तकाविषयी बोलताना श्रीकांत किल्लेदार म्हणाले, समर्थ साहित्याचा अभ्यास करताना नेतृत्व करणारी व्यक्तीच नेतृत्व करण्यास सक्षम व्यक्ती घडवू शकते, असे लक्षात आले. यातूनच समर्थ नेतृत्व या पुस्तकाची निर्मिती झाली.

प्रकाशक नितीन खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गिरीश तेलंग यांनी पुस्तकाविषयी विवेचन केले. मान्यवरांचा सत्कार माधव किल्लेदार आणि नितीन खैरे यांनी केला. प्रणव तडवळकर यांनी देवी स्तुती आणि समर्थ रामदास स्वामी रचित पसायदान सादर केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.