महायुतीच्या विरोधात शरद पवार हिमालयासारखे भक्कमपणे उभे – सुजाता पवार

महायुतीच्या विरोधात शरद पवार हिमालयासारखे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यांवर आता महायुतीतील नेते पुन्हा बरळु लागले आहेत. विचारांची पातळी खालावली की माणसांचा दर्जा ही खालावला जातो.

अशा दर्जाहीन वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी संतप्त भावना जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी व्यक्त केली.

गुनाट ( ता. शिरूर ) येथे महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ गाव भेट दौरा आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सतिष कोळपे, चेअरमन सचिन कर्पे, माजी सरपंच गहीनीनाथ डोंगरे, अनिल कर्पे, भाऊसाहेब कर्पे, संतोष भोस यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुजाता पवार म्हणाल्या, शरद पवार यांना महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. त्यासाठी ते या वयातही महाराष्ट्रभर वायुवेगाने दौरे करत आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा इतका विलक्षण असल्याने महायुतीच्या नेत्यांना त्याची धडकीच भरते. त्यामुळेच ते पातळी सोडून टिका करत आहेत. शरद पवार साहेबांवर मनापासुन प्रेम करणाऱ्या टिकेला मतदान हा मतपेटीतूनच व्यक्त होईल.