लोणी काळभोर प्रतिनिधी -शिरूर हवेलीत मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट ) काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी निवडणुकीपूर्वीच संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे .
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रचाराचा धडाका लावत आमदार अशोक पवार यांनी आज तरी प्रचारात आघाडी घेतली आहे .तर दुसरीकडे उमेदवारी ठरण्यात महायुतीचे घोडे अडले असले तरीही आयात उमेदवार नको तर आमच्यापैकीच एकाला संधी द्या असे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे असल्याने महायुतीचा उमेदवार ठरवण्यात अनेक अडचणी येत आहे.त्यामुळे महायुतीत उमेदवारीबाबत घोळात घोळ असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर विधानसभेची जागा महायुती मधून कोण लढवणार याबाबत अजूनही महायुतीत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर विधानसभेची ही जागा भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाकडून कोण लढवणार याबाबत अनेक उमेदवारांकडून दावे प्रतिदावे होत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बराचसा बदल झाला आहे. या मतदारसंघांमध्ये चार लाख 60 हजारच्या आसपास मतदार आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत पोहोचणे दहा पंधरा वीस दिवसात शक्य नाही. तसेच निवडणुकीचे नियोजन करत संपूर्ण मतदारसंघात प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी कसरत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार,त्यांचे कुटुंब नातेवाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ही निवडणूक जिंकण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असुन त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण होऊन दुसरीही पूर्ण होण्याच्या तयारीत आहे.
त्यात आमदार अशोक पवार यांनी शेकडो कोटीची कामे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये मंजूर करून आणली आहेत.मतदारांच्या गाठीभाठी तसेच आमदार आपल्या गावी मुक्कामी या धर्तीवर अनेक गावांमध्ये एक दिवस मुक्काम करून त्यांनी प्रचाराला सुरवातही केली आहे. त्यांच्या प्रचाराचे नियोजन पाहता महायुती कडून अद्याप उमेदवारीचे घोंगडे अजूनही भिजत असल्याचे दिसून येत आहे.
तर ठाकरे गटाचे माऊली कटके यांनी महाकाल यात्रेच्या निमित्ताने अनेक मतदारांशी संपर्क साधला असुन त्या निमित्ताने निवडणूक प्रचार चालू केला आहे .परंतु माऊली कटके हे अपक्ष लढणार का हातात घडयाळ बांधणार हे अजुनही गुलदस्त्यातच आहे .तर भाजप कडून प्रदिप कंद ,व जयश्री पलांडे या इच्छुक असुन भाजपचा उमेदवार अजुन घोषित झाला नाही.
त्यामुळे आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार हे एकमेव उमेदवार विधानसभेच्या आखाडयात उभे ठाकले असून त्यांच्या तोडीचा पहिलवान महायुती कधी देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. महायुतीत हा मतदारसंघ कुणाकडे जातो याकडे शिरुर हवेलीतील मतदारांच्या नजरा लागल्या आहेत .