‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ उपक्रमांतर्गत ‘कीर्तने अँड पंडित’तर्फे शूरवीरांचा सन्मान

पुणे: देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीने मेरा तिरंगा मेरा अभिमान उपक्रमांतर्गत शूरवीरांचा सन्मान करण्यात आला. १९७१ च्या युद्धात कामगिरी बजावलेले ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर, १९६५ च्या बांगलादेश युद्धात जखमी व १९७१ च्या पाकिस्तान युद्धात शहीद झालेले सैन्यातील जवान सुडकोजी जाधव आणि कुपवाडा येथे २००८ मध्ये राबविण्यात आलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे नायब सुभेदार संतोष राळे या तिघांना मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय वायुदलात महत्वाचे योगदान देणाऱ्या दिलीप परुळकर यांच्यावर सिनेमा, तसेच पुस्तकाची निर्मिती झाली आहे. विशिष्ट सेवा पदक, वायू सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे. शहीद सुडकोजी जाधव यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. त्यांचे चिरंजीव विजय जाधव हे कीर्तने अँड पंडित संस्थेत कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राष्ट्रीय रायफलच्या घातक प्लाटूनचे सेक्शन कमांडर म्हणून संतोष राळे तैनात होते. आपल्या शौर्याने राळे यांनी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करून समर्पित सेवेचे दर्शन घडवले. त्यांना २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

सीए मिलिंद लिमये यांच्या मार्गदर्शनात सीए प्रल्हाद मानधना, सीए अखिलेश जोशी, अनुजा देवधर, स्नेहा पाटोळे यांनी या शूरवीरांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षी ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ हे अभियान राबविण्यात येते. तिरंगा ध्वज संकलन, रक्तदान शिबीर आदी उपक्रमांचा समावेश यामध्ये असतो, असे सीए मिलिंद लिमये यांनी नमूद केले.