ॲपेरल मेड-अप्स अँड होम फर्निशिंग सेक्टर स्किल कौन्सिल (एएमएचएसएससी) यांनी ब्ल्यूसाईन यांच्यासह संयुक्तपणे “फाऊंडेशन टू ॲपेरल सस्टेनेबिलिटी” हा ई-लर्निंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित करण्यात आलेला हा लॉन्च इव्हेंट भारताच्या वस्त्रोद्योग आणि वस्त्र-प्रावरणे क्षेत्रातील शाश्वतता आणि नैतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे.
भारताचा वस्त्रोद्योग आणि वस्त्र-प्रावरणे उद्योग हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्यांचा वाटा अंदाजे २ टक्के आणि उत्पादन क्षेत्रात १८ टक्के वाटा आहे. हे क्षेत्र ४ कोटी ५० लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देते, तर संबंधित उद्योगांमध्ये आणखी ६ कोटी लोकांना आधार देते. जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून भारताच्या भूमिकेतून या क्षेत्रातील शाश्वत विकासाची गरज अधोरेखित होते.
या कार्यक्रमात एएमएचएसएससीचे संचालक आणि केटी कॉर्पोरेशन (प्रा.) लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रेमल उदानी, एएमएचएसएससीचे संचालक आणि क्रिएटिव्ह गारमेंट्स प्रा. लिमिटेडचे सदस्य श्री. विजयकुमार जमनाधर अग्रवाल, एएमएचएसएससीचे संचालक आणि क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएमएआय) अध्यक्ष श्री. राजेश मसंद, एएमएचएसएससीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. ए. शक्तीवेल आणि ब्ल्यूसाईन टेक्नॉलॉजीजच्या डायरेक्टर कस्टमर रिलेशन्स कॅथरीना वेरेना उपस्थित होते. शाश्वत भविष्यासाठी कटिबद्धता व्यक्त करणाऱ्या दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली.
एएमएचएसएससीच्या सहकार्याने ब्ल्यूसाईन अॅकेडमीने विकसित केलेला हा फाउंडेशन टू ॲपेरल सस्टेनेबिलिटी अभ्यासक्रम सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होईल. हा अभ्यासक्रम आठ आठवड्यांच्या ऑनलाइन मॉड्यूल स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे आणि प्रत्येक आठवड्यात एक ई-लर्निंग सत्र असेल. वस्त्रोद्योगातील पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) पैलूंचा सखोल शोध देणे हे त्याचे उद्दिष्ट असून तो प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेवर केंद्रित आहे. माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या २०७० पर्यंत नेट झिरो गाठण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी हा अभ्यासक्रम सुसंगत आहे. उद्योगातील नेत्यांना शाश्वत कार्यपद्धती अमलात आणण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये तो पुरवतो.
या अभ्यासक्रमाची रचना व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचा वापर सहभागी व्यक्ती थेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये करू शकतील. वस्त्र-प्रावरणे उद्योगातील वरिष्ठ आणि मध्यम व्यवस्थापनासाठी बनविलेला हा अभ्यासक्रम या नेत्यांना जबाबदार बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या शाश्वततेमध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येण्यास सुसज्ज करतो. शाश्वत फॅशनचा परिचय, फॅशन उद्योगाचा ऐतिहासिक आढावा, शाश्वत तंतू, इको-फ्रेंडली कापड प्रक्रिया, परिणाम आणि फूटप्रिंट मूल्यांकन, रसायन व्यवस्थापन आणि धोक्याचे मूल्यमापन,वस्त्र-प्रावरणे शाश्वततेचे सामाजिक आणि नैतिक पैलू आणि शाश्वतता रिपोर्टिंग या विषयांचा
एएमएचएसएससीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. ए. शक्तीवेल म्हणाले, “मुंबईचा गतिमान आणि प्रभावशाली वस्त्रोद्योग हा शाश्वत कार्यपद्धतींचे नेतृत्व करण्यासाठी सर्वथा योग्य आहे. जबाबदारीपूर्वक प्रयोगशीलता राबविण्यासाठी हा अभ्यासक्रम आमच्या व्यावसायिकांना आवश्यक साधनांनी सुसज्ज करेल.”
ब्ल्यूसाईन टेक्नॉलॉजीच्या डायरेक्टर कस्टमर रिलेशन्स सुश्री कॅथरीना वेरेना मेयर म्हणाल्या, “मुंबईमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करणे हे भारताच्या वस्त्रोद्योगाच्या केंद्रस्थानी शाश्वततेला अंतर्भूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचा होणारा सकारात्मक परिणाम पाहून आम्ही उत्साहित आहोत.”
एएमएचएसएससीचे संचालक आणि क्रिएटिव्ह गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. विजयकुमार जमनाधर अग्रवाल यांनी आपल्या भाषणात घरगुती वस्त्रोद्योगातील ईएसजीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. जागतिक घरगुती वस्त्रोद्योगात भारताचा ७ टक्के वाटा असल्याचे अधोरेखित करून, त्यांनी देशाच्या समृद्ध वस्त्रोद्योग इतिहासाचा उल्लेख केला.
तसेच जगभरातील विशिष्ट विभाग आणि ब्रँड्सची गरज भागविण्याबद्दल त्याची जागतिक दर्जाची ओळख असल्याचे सांगितले. पुनर्वापर केलेले वस्त्र, सेंद्रिय कापूस, विस्तारित व्यापार जबाबदाऱ्या आणि अखंड व्यापार सुनिश्चित करण्यासाठी कार्बन नियमांचे पालन करण्याची गरज अग्रवाल यांनी अधोरेखित केली. ईएसजी मानदंड विकसित केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत बदल होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळेल असे ते म्हणाले.
क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएमएआय) अध्यक्ष आणि एएमएचएसएससीचे संचालक श्री. राजेश मसंद यांनी देशांतर्गत वस्त्र-प्रावरणे उत्पादकांच्या दृष्टीकोनातून माहिती दिली. शॉपर्स स्टॉप आणि लँडमार्क यांसारखे देशांतर्गत ब्रँडसुद्धा पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन मानकांचे अधिक पालन करणाऱ्या पुरवठादार आणि विक्रेत्यांकडून वाढत्या प्रमाणात सोर्स करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. या बदलत्या बदलांशी जुळवून घेण्याची, आवश्यक सुधारणा अंमलात आणण्याची आणि कारखान्यातील अनुपालन सुनिश्चित करण्याची हीच योग्य वेळ असल्यावर मसंद यांनी भर दिला.
एएमएचएसएससीचे संचालक आणि केटी कॉर्पोरेशन (प्रा.) लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रेमल उदानी यांनी वस्त्र-प्रावरणे क्षेत्रातील दर्जेदार वितरणाची भारताची कामगिरी अधोरेखित केली. भारत आता ईसीजी अनुपालनामध्ये अग्रेसर होण्याची तयारी करत असून सामाजिक अनुपालनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आदर्श होण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.
हा उपक्रम आंतरराष्ट्रीय मानकांशी तसेच नैतिक आणि शाश्वत उत्पादनांसाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीशी सुसंगत आहे. भारताच्या वस्त्रोद्योग आणि परिधान क्षेत्रातील जबाबदार व्यवसाय आचरणासाठी तो एक नवीन मापदंड स्थापित करत आहे. मुंबईत स्थानिक उद्योगाच्या कार्यपद्धतींमध्ये बदल घडवून आणणे, शाश्वततेला चालना देणे आणि गतिमान आर्थिक केंद्रामध्ये स्पर्धात्मकता वाढवणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.