हिंदूंच्या विरोधातील वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी अधिवक्त्यांची ‘इकोसिस्टिम’ आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अधिवक्त्यांचे योगदान अतुलनीय आहे. लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लाजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास अशा अनेक अधिवक्त्यांनी त्या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न केले. अशाच प्रकारे हिंदू अधिवक्त्यांचे संघटन सक्रीय बनले, तर आगामी काळात हिंदु राष्ट्र्राची निश्चितच स्थापना होईल. आज विरोधकांकडून न्यायालयाच्या माध्यमातून वैचारिक युद्ध चालू केले गेले आहे, त्यामुळे हिंदूंची बाजू कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्यकता आहे. धर्मसंस्थापनेच्या या कार्यात योगदान देण्यासाठी हिंदु अधिवक्त्यांनी ‘इकोसिस्टिम’ उभी करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी ते ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान’ यावर बोलत होते.
भारतासाठी क्रिकेट खेळ; परंतु पाकिस्तानसाठी तो ‘जिहाद’ ! – अधिवक्ता विनीत जिंदाल
‘क्रिकेट जिहाद’ यावर बोलतांना सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल म्हणाले, ‘‘भारतात क्रिकेट हा खेळासारखा खिलाडूवृत्तीने खेळला जातो; पण भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना मात्र पाकिस्तानसाठी युद्धासारखा असतो. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांनी ‘भारताच्या विरोधात क्रिकेट खेळणे हे जिहाद आहे’, असे सांगितले होते. नुकतेच पाकिस्तानच्या एका फलंदाजाने त्याचे शतक ‘पॅलेस्टाईनला’ अर्पण केले होते. त्यामुळे या जिहादच्या विरोधात हिंदूंनीही जागृत राहिले पाहिजे.’’
वर्तमान कायदे कुटुंबव्यवस्था नष्ट करणारे; त्यामुळे हिंदूंनी कौटुंबिक समस्या सामोपचाराने सोडवाव्यात ! – प्रा. मधू पौर्णिमा किश्वर, लेखिका
भारतातील हिंदू समाज, कुटुंब व्यवस्था यांना तोडण्यासाठी इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही विविध प्रकारचे कायदे आणण्यात आले. भारतात महिलेला देवीचे स्थान आहे; मात्र भारतावर झालेल्या इस्लामिक आक्रमणानंतर आक्रमकांपासून हिंदू महिलांचे संरक्षण होण्यासाठी हिंदूंमध्ये बालविवाह, पडदा या प्रथा निर्माण झाल्या. ख्रिस्ती धर्मप्रसारक आणि कथित समाजसुधारक यांनी त्या प्रथांना घातक ठरवून त्या बंद करण्यासाठी त्यांच्या विरोधात कायदे केले. बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार यांच्या संदर्भातील खोट्या खटल्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, तर अनेक पुरुष आत्महत्या करत आहेत. समाजसेवेचा बुरखा पांघरलेल्या स्वयंसेवी संस्था या व्यवस्थांना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंनी कुटुंबव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या समस्या कौटुंबिक स्तरावरच सामोपचाराने सोडवल्यास कुटुंब आणि समाज एकसंध राहील, असे प्रतिपादन दिल्ली येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. मधु पौर्णिमा किश्वर यांनी केले.