पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्था (व्हॅम्निकॉम) ही देशातील सहकार क्षेत्रात भरीव काम करणारी संस्था आहे. गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ या संस्थेने उत्तम कार्य केले आहे. भविष्यातही तिचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली
केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेस (व्हॅम्निकॉम) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते .व्हॅम्निकॉम ही सहकार मंत्रालयाने प्रवर्तित केलेल्या राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण परिषद (एनसीसीटी) या स्वायत्त संस्थेच्या अंतर्गत असलेली राष्ट्रीय संस्था आहे .
याप्रसंगी मंत्री मोहोळ यांनी वैकुंठ मेहता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.व्हॅम्निकॉमच्या संचालिका हेमा यादव यांनी पुष्गुच्छ देऊन मोहोळ यांचे स्वागत केले.
आपल्या भाषणात हेमा यादव यांनी सहकार राज्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्याबद्दल मोहोळ यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्यकाळात व्हॅम्निकॉम आणखी अनेक उपक्रम हाती घेईल, त्यातून महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशातील सहकार चळवळ बळकट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मंत्री मोहोळ यांनी अध्यापक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून १९६७ पासून सहकार क्षेत्रात व्हॅम्निकॉमने बजावलेली भूमिका जाणून घेतली. व्हॅम्निकॉममध्ये सुरू असलेले सर्व केंद्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांचा त्यांनी आढावा घेतला. सहकारी संस्था बाबत त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला.
आपल्या संबोधनात मंत्री मोहोळ यांनी संस्थेने केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी समृद्धीसाठी राबविलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपले कार्य चालू ठेवावे असे आवाहन त्यांनी अध्यापक व कर्मचाऱ्यांना केले.
व्हॅम्निकॉमची स्थापना १९४८ मध्ये मुंबईत झाली होती व त्यानंतर १९६७ मध्ये तिचे स्थलांतर पुण्याला झाले.सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर व्हॅम्निकॉमने चालविलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दलही मंत्र्यांना माहिती देण्यात आली.सहकार क्षेत्रात व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने पीजीडीएम (एबीएम) च्या २०२२-२४ बॅचमध्ये १०० टक्के प्लेसमेंटची गौरवास्पद कामगिरी करून दाखवली आहे.
कल्याणकारी राज्याला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यातकरिता ६ जुलै २०२१ रोजी वेगळ्या सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकाराचा फायदा मिळावा यासाठी सहकार मंत्रालयाने आपल्या स्थापनेपासून असंख्य उपक्रम राबविले आहेत.