पुणे : ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंडांच्या मालकीच्या भारतातील ग्रेड ए लॉजिस्टिक पार्कचा भाग असलेला होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सने पुणे,चाकण पाचव्या प्लॅन्स येथील आपल्या दुसऱ्या इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक पार्कच्या भूमीपूजनाची घोषणा केली आहे. हे १०० एकरचे पार्क सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांनी युक्त, देशातील उत्तम प्रकारे विकसित अशा प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक असणाऱ्या चाकण येथे आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाद्वारे (एक्स्प्रेस वे) मुंबई व पुण्याशी तसेच जेएनपीटी बंदराशी जवळीक असल्यामुळे चाकण हे औद्योगिक आणि लॉजिस्टिक ऑपरेशन्ससाठी एक आदर्श ठिकाण ठरते.
होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सने नुकतेच ५२ एकर चाकण दुसऱ्या उद्यानाचा विकास पूर्ण केला आहे. हे पार्क विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत कंपन्यांचे तळ आहे. यात वाहनाचे सुटे भाग, अभियांत्रिकी आणि थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांचा समावेश आहे.
ब्लॅकस्टोनचे प्रिंसिपल उर्विश रांभिया म्हणाले, “चाकण पाचव्या प्लॅन्स येथे भूमिपूजन करताना आम्हाला आनंद होत आहे. मोक्याच्या ठिकाणी उच्च दर्जाची लॉजिस्टिक मालमत्ता प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून अत्याधुनिक सुविधेच्या स्वरूपात हिचे बांधकाम केले जाईल. ई-कॉमर्सचा वापर वाढल्याने आणि भरघोस औद्योगिक वाढीमुळे आम्हाला भारतात आधुनिक वेअरहाऊसिंग मागणी जोरात असल्याचे दिसून येत आहे.”
ब्लॅकस्टोन ही जागतिक स्तरावर वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक स्पेसची सर्वात मोठी मालक असून तिने लॉजिस्टिक्स विभागात ५५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. जागतिक पातळीवर तिच्याकडे ५७५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त वेअरहाउसिंग स्पेसची मालकी आहे. भारतात ब्लॅकस्टोन ही सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असून तिच्याकडे ५० अब्ज डॉलरच्या मालमत्तांचे व्यवस्थापन आहे.
ब्लॅकस्टोन ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक रिअल इस्टेट मालक असून किरकोळ विक्री, वेअरहाउसिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात ती सर्वात मोठी आहे. वेअरहाऊसिंग क्षेत्रात ब्लॅकस्टोनने होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स पोर्टफोलिओच्या उभारणीसाठी एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यात ४० दशलक्ष चौरस फूट वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक स्पेसचा समावेश आहे.
भारतातील आपला लॉजिस्टिक पोर्टफोलिओ सध्याच्या 40 दशलक्ष चौरस फूटावरून २.५ पटीने वाढवून १०० दशलक्ष चौरस फूट करण्याची ब्लॅकस्टोनची योजना आहे. सध्याचे आपले संयुक्त उद्यम (जेव्ही) आणि भागीदारीच्या माध्यमातून तसेच येत्या तीन ते पाच वर्षांत नवीन भागीदारींवर लक्ष केंद्रीत करून हे साध्य करण्यात येईल.
होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सबद्दल: होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स हा ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंडांच्या मालकीचा भारतातील लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (तिच्या संलग्न कंपन्यांसह) १,७०० एकर पेक्षा जास्त आणि ४२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या २४ औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्सचे व्यवस्थापन करते. भारतातील १० प्रमुख बाजारपेठांमध्ये ते आहेत.