नाशिक : डेंग्यूपाठोपाठ शहर जिल्ह्यावर आता स्वाईन फ्लूचेही संकट कोसळले आहे. सिन्नर तालुक्यातील दातली गावातील ६३ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरातही दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गेल्यावर्षी शहरात डेंग्यूने थैमान घातले होते. डिसेंबरअखेर डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी आता स्वाईन फ्लूच्या रुपाने नाशिककरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शहरातील बदलते वातावरण स्वाईन फ्लूच्या साथीला निमंत्रण देणारे ठरले आहे. वाढत्या तापमानामुळे तापाचे रुग्ण वाढत असतांना आता स्वाईन फ्लूनेही शहरात शिरकाव केला आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एक महिलेचा तर एका पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचे अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झाले असले तरी, सिन्नर मधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिलेचा शहरातील एका खासगी रुग्णालयात स्वाईनफ्लूमुळे मृत्यु झाला आहे. सर्दी व तापामुळे या महिलेला नाशिकरोड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यु झाला आहे. सदर महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. २०२२ मध्ये स्वाईन फ्लूने शहरातील दहा ग्रामीण भागातील पंधरा अशा एकूण २५ जणांचा बळी घेतला होता.