पुणे, एप्रिल २०२४: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे, यांच्या वतीने ‘विकसित भारत २०४७’ च्या दूरदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने, नुकतीच ‘टेलिमेडिसिन क्षेत्राच्या भविष्यातील धोरण’ आणि निरोगी भविष्यासाठी एक आरोग्य दृष्टीकोन या विषयांवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, तोपर्यंत भारताचा विकसित देश म्हणून कायापालट घडवून आणण्यासाठीच्या दूरदर्शी योजनांवरील चर्चेत तरुणांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारने सुरू केलेला विकसित भारत २०४७ चा कार्यक्रम देशाच्या विविध क्षेत्रांमधील सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोनातून आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, “विकसित भारत: युवकांचा आवाज” आणि “अमृत काल विमर्श: विकसित भारत @ २०४७” यासारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले असून, यात विद्यापीठे आणि महाविद्यालयांसह विविध घटकांना सूचना, मते पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. प्राची साठे आणि बालरोग शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. रट्टा यांनी संवादात्मक विचारमंथन सत्राचे नेतृत्व केले. त्यांनी आरोग्यसेवेतील टेलिमेडिसिनच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. बी.एस. रट्टा यांनी टेलिमेडिसिनची गरज आणि सर्वसामान्य जनतेचे निरोगी आयुष्य वाढवण्याची क्षमता याबाबत सखोल विवेचन केले. दरम्यान, डॉ. प्राची साठे यांनी आरोग्यसेवेतील डिजिटलायझेशनच्या महत्त्वावर भर दिला आणि टेल-आयसीयू हे एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान असल्याचे अधोरेखित केले.