पुणे : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७४ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १० एप्रिल) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ, येरवडा, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, विजय दासवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, “चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी आणि टीम, नागपूरची प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा, राजस्थानचे उत्कृष्ठ गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जयपूर येथील विनोदवीर भाग्यश्री दर्यानी सादरीकरण करणार आहे. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहे. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.”
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसवानी प्रोमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी असणार आहेत. निवृत्त न्यायाधीश व महाराष्ट्राचे लोकायुक्त एम. एल. तहालियानी आणि बीजे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. लछमनदास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३७ वर्ष कार्यरत आहे,” असे सुरेश जेठवानी यांनी नमूद केले.