विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी (ता. २६) पुण्यात आयोजन

By: Editor_Manas

On: Friday, November 20, 2026 4:02 PM

Google News
Follow Us
पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य आणि विज्ञानाचा संगम असलेले हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (ता. २६) एस. पी कॉलेज मैदानाजवळील ज्ञानमंडपम येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. नितीन करमाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विज्ञान भारतीचे सचिव कौस्तुभ साखरे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रमा कुलकर्णी व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. संजीवनी सोनार, विज्ञानभारतीचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री श्री प्रसाद, संशोधन, इनोव्हेशन आणि इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दुराफे आदी उपस्थित होते.
डॉ. नितीन करमाळकर म्हणाले, “ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे या विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे प्रमुख पाहुणे असणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विज्ञान भारतीचे संस्थापक सदस्य डॉ. क. कृ. क्षीरसागर, शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीतील हे महत्त्वाचे संमेलन असणार आहे. त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि प्रामुख्याने मराठीतून विज्ञानाचा प्रचार प्रसार करु इच्छिणाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या संमेलनाला उपस्थित राहावे.”
सुधीर काळकर म्हणाले, “या संमेलनाचे संयोजक शिक्षण प्रसारक मंडळीचे संशोधन, इनोव्हेशन व इन्क्युबेशन केंद्र आहे. अशाप्रकारचे संमेलन आयोजित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने शिक्षण, विज्ञान आणि साहित्य तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवता येणार आहेत. येणाऱ्या पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोन कसा देतानाच नवनिर्मितीला चालना मिळावी, हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. नवोपक्रम, विज्ञान संशोधन व स्टार्टअप संस्कृती विकसित होण्यास या संमेलनामुळे निश्चितच मदत होईल.”
कौस्तुभ साखरे म्हणाले, “एकदिवसीय संमेलनात उद्घाटन व समारोप सत्रासोबतच विज्ञानकथा वाचन, विज्ञान साहित्यिक परिसंवाद, शास्त्रज्ञांशी विशेष संवाद व पॉडकास्ट अशी विशेष सत्रे होतील. मराठीतील विज्ञानविषयक साहित्याचा गौरव करणे आणि नवोदित लेखक आणि विज्ञान संवादकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच संमेलनाच्या निमित्ताने मराठी विज्ञानकथा लेखन आणि अभिवाचन स्पर्धेची घोषणा केली जाणार आहे.”
रमा कुलकर्णी म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना विज्ञान आणि मराठी साहित्याची ओळख व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीही विज्ञानकथा अभिवाचन स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला असून, या स्पर्धेचा निकाल संमेलनाच्या समारोप सत्रात जाहीर करण्यात येणार आहे.”
विज्ञानकथा स्पर्धेचे प्रायोजकत्व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगकडे असल्याचे डॉ. संजीवनी सोनार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये दोन शाखांचा अभ्यासक्रम मराठी विषयातून शिकवला जातो, असे त्या म्हणाल्या.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 20, 2026

November 20, 2026

November 20, 2026

November 20, 2026

November 20, 2026

November 20, 2026