नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026: भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये कार्यरत असलेल्या मॉन्ट्रा इलेक्ट्रिकने आज आपल्या मानेसर येथील उत्पादन केंद्रातून 1,000 वा राइनो इलेक्ट्रिक ट्रक बाजारात आणला. हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणारा मॉन्ट्रा इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला ब्रँड ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण यशाचा गौरव करण्यासाठी कंपनीने ‘1,000 राइनोज अँड बियॉन्ड. चार्ज द चेंज.’ ही संकल्पना सादर केली आहे. आतापर्यंत रस्त्यावर उतरवण्यात आलेल्या सर्व राइनो ट्रक्सनी एकत्रितपणे 36 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. या ट्रक्समुळे 6.5 दशलक्ष किलोपेक्षा अधिक कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन टाळण्यात आले आहे. ही बचत एका वर्षात सुमारे 14 लाख झाडे शोषून घेत असलेल्या कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाइतकी आहे. याशिवाय, या ट्रक्समुळे त्यांच्या चालक आणि मालकांची परिचालन खर्चात 70 कोटी रु. पेक्षा अधिक बचत झाली आहे.
जानेवारी 2026 मध्ये राइनो 5538 ईव्ही ला पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत प्रमाणपत्र मिळाल्याने या प्रवासाला आणखी गती मिळाली. या योजनेअंतर्गत प्रमाणित होणारा राइनो 5538 ईव्ही हा भारतातील पहिला अवजड इलेक्ट्रिक ट्रक ठरला. या योजनेमुळे खरेदीदारांना प्रत्येक वाहनामागे 9.6 लाख रु. पर्यंतचे प्रोत्साहन मिळते.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जलज गुप्ता (टीआय क्लीन मोबिलिटी प्रा. लि.) म्हणाले, “आम्ही या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा भारतात अवजड इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी कोणतीही बाजारपेठ अस्तित्वात नव्हती. प्रत्येक खेपेसह या ट्रक्समधून अपेक्षित कामगिरी साध्य होऊ शकते आणि त्यांची खरेदी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, हे आम्हाला सिद्ध करावे लागले. पीएम ई-ड्राइव्हसारख्या सरकारी धोरणांचा पाठिंबा आणि आपल्या वाहनांच्या ताफ्याचा विस्तार करण्यासाठी पुन्हा आमच्याकडे येणारे ग्राहक यांच्या बळावर भारतातील इलेक्ट्रिक अवजड ट्रक वाहतूक क्षेत्र आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. आमचे पहिले 1,000 राइनो ट्रक्स जितके आमचे आहेत, तितकेच ते आमच्या ग्राहकांचे आणि भागीदारांचेही आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळातच इलेक्ट्रिक ट्रक्सवर विश्वास दाखवला. आता पुढील 1,000 ट्रक्सची निर्मिती याच विश्वासाच्या बळावर केली जाईल.”
मॉन्ट्रा इलेक्ट्रिकने या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा भारतातील मोजक्याच फ्लीट ऑपरेटर्सनी अवजड इलेक्ट्रिक ट्रक वापरले होते. चार्जिंग केंद्रांची उपलब्धताही अत्यंत मर्यादित होती. बॅटरीवर चालणारा ट्रक पूर्ण क्षमतेने मालाची वाहतूक करू शकेल का, लांब पल्ल्याचा प्रवास करू शकेल का आणि तरीही व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल का याबाबत खरेदीदारांच्या मनात शंका होत्या. या शंकांचे निरसन करण्यासाठी कंपनीने प्रत्यक्ष ग्राहकांच्या वाहतूक मार्गांवर, प्रत्येक टप्प्यावर एक वाहन तैनात करून त्याची कार्यक्षमता सिद्ध करण्याचा मार्ग निवडला.
मॉन्ट्रा इलेक्ट्रिकच्या (आयपीएल टेक प्रा. लि.) इलेक्ट्रिक आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहन यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत सेठी म्हणाले, “1,000 व्या राइनो ट्रकचे उत्पादन केंद्रातून लोकार्पण होणे हा भारतातील इलेक्ट्रिक अवजड ट्रक वाहतुकीची व्यावसायिक व्यवहार्यता सिद्ध करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आमच्या ट्रक्सनी फ्लीट ऑपरेटर्ससाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या निकषांवर आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामध्ये मालवाहतुकीदरम्यानची कामगिरी, वाहनाची कार्यान्वयन उपलब्धता, एका चार्जमध्ये कापता येणारे अंतर आणि खर्चातील कार्यक्षमता यांचा समावेश आहे. तसेच, आव्हानात्मक व्यावसायिक वापर आणि लांब पल्ल्याच्या वाहतूक मार्गांवरही या ट्रक्सनी प्रभावी कामगिरी केली आहे. ग्राहकांकडून सातत्याने परत मिळणाऱ्या ऑर्डर्स या उत्पादनावरील त्यांचा विश्वास आणि त्यातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष व्यावसायिक मूल्याचे द्योतक आहेत. आता या यशाची गती कायम राखणे, ग्राहकांसोबतची भागीदारी अधिक दृढ करणे आणि भारतातील प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांमध्ये व बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक अवजड ट्रक्सचा विस्तार करणे, हे आमचे पुढील प्राधान्य असेल.”
मॉन्ट्रा इलेक्ट्रिक आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, वाहनांचा ताफा मोठ्या प्रमाणावर वाढवणे, ग्राहकांसोबतची भागीदारी अधिक मजबूत करणे आणि भारताच्या वाहतूक व्यवस्थेच्या संपूर्ण परिसंस्थेत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा वापर वाढवणे यावर कंपनीचा भर असेल. इलेक्ट्रिक अवजड ट्रक वाहतुकीसाठी बाजारपेठ निर्माण करण्याच्या उद्दिष्टापासून या तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व्यवहार्यता सिद्ध करण्यापर्यंतच्या मॉन्ट्रा इलेक्ट्रिकच्या प्रवासातून तंत्रज्ञान, ग्राहकांचा विश्वास आणि दीर्घकालीन बांधिलकी यांचा संगम झाल्यास कोणत्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात हे दिसून येते.





