चौथ्या सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो २०२६ आणि सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६ च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड येथे सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६ चे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इलेक्ट्रिक मोबिलिटी, ऑटोमोबाईल तंत्रज्ञान, प्रगत कोटिंग्ज, सरफेस इंजिनिअरिंग आणि इंटेलिजंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना सादर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील मान्यवर, उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकत्र आले आहेत. यासोबत आयोजित परिषदांमध्ये स्थानिकीकरण, पुरवठा साखळीची सक्षमता, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत उत्पादन प्रक्रिया या विषयांवर चर्चा होत असून, जागतिक मोबिलिटी क्षेत्रातील भारताची वाढती भूमिका अधोरेखित केली जाणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी सीआयआय पश्चिम विभाग सरफेस कोटिंग शो २०२६ आयोजन समितीचे अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईच्या मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अँड मटेरियल्स सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. स्मृतिरंजन परिदा, प्रिझम सरफेस कोटिंग्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम कुमार गणेशन, सिद्धार्थ ऑटोमॅट इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेंदर यादव,टेकएक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जे. व्ही. इंगळे, महिंद्रा अँड महिंद्राच्या पेंट शॉपचे प्रमुख अनंत खोंड, ब्लू एनर्जी मोटर्सचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ए. रामसुब्रमणियन उपस्थित होते. तसेच मेटल फिनिशर्स असोसिएशन, नाशिक चे अध्यक्ष आणि श्री रसायनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
ब्लू एनर्जी मोटर्सचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ए. रामसुब्रमणियन म्हणाले, “भारताचा ऑटोमोबाईल उद्योग वेगाने तांत्रिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असताना, गुणवत्ता, आकर्षकता आणि टिकाऊपणाच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरफेस ट्रीटमेंट आणि कोटिंग तंत्रज्ञानातही बदल होणे आवश्यक आहे. केवळ खर्च आणि फिनिशिंगवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, कोटिंग सोल्युशन्स विकसित करताना मूळ मटेरियल आणि त्याच्याशी असलेली सुसंगतता यांचा सखोल विचार केला पाहिजे, असे मला वाटते. विशेषतः उद्योगक्षेत्र नवीन तंत्रज्ञान आणि मटेरियल्सकडे वळत असताना, उत्पादनाची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि सेवा कालावधी वाढविण्यासाठी सरफेस इंजिनिअरिंगमधील नावीन्यपूर्ण संशोधन महत्त्वपूर्ण ठरेल.”
महिंद्रा अँड महिंद्राच्या पेंट शॉपचे प्रमुख अनंत खोंड म्हणाले, “सरफेस कोटिंग ही उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण क्षमता असून, विशेषतः ऑटोमोबाईल उद्योगात उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि ग्राहकांचे समाधान यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. ऑटोमेशन, डिजिटल तंत्रज्ञान, प्रगत मटेरियल्स आणि शाश्वत उत्पादन पद्धती या क्षेत्राचे भविष्य घडवतील, असा माझा विश्वास आहे. ओईएम कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि संशोधन संस्थांमधील अधिक जवळचे सहकार्य, तसेच स्थानिकीकरण आणि स्वदेशी संशोधनावर भर दिल्यास भारतात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सरफेस इंजिनिअरिंग इकोसिस्टम विकसित होण्यास मदत होईल.”
प्रिझम सरफेस कोटिंग्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम कुमार गणेशन म्हणाले, “जागतिक दर्जाचे सरफेस कोटिंग तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी स्पर्धा करण्याची क्षमता व कौशल्य भारताकडे आहे. सरफेस कोटिंग म्हणजे केवळ रंग लावणे नव्हे, तर त्यामध्ये अभियांत्रिकी, ऑटोमेशन, शाश्वतता, उत्पादकता आणि दीर्घकालीन गुणवत्ता या बाबींचा समावेश होतो. पुण्यातील भक्कम उत्पादन क्षेत्र आणि अभियांत्रिकी कौशल्यामुळे या प्रगतीला चालना देण्यासाठी हे शहर योग्य ठिकाण आहे. या प्रदर्शनामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नावीन्यपूर्ण संशोधन आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळून भारतीय उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे.”
सिद्धार्थ ऑटोमॅट इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेंदर यादव म्हणाले, “आधुनिक उत्पादन प्रक्रियेत सरफेस इंजिनिअरिंगला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले असून, उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेवर त्याचा थेट परिणाम होतो. सरफेस फिनिशिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनविण्यात ऑटोमेशन, नावीन्यपूर्ण संशोधन आणि शाश्वत पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रक्रियेतील सातत्य राखणे, आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ऑटोमेशन व इंटेलिजंट प्रोसेस कंट्रोल आवश्यक आहेत. यामुळे उत्पादकता आणि कार्यात्मक कार्यक्षमताही वाढण्यास मदत होईल.”
सीआयआय पश्चिम विभाग सरफेस कोटिंग शो २०२६ आयोजन समितीचे अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईच्या मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अँड मटेरियल्स सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. स्मृतिरंजन परिदा म्हणाले, “उत्पादनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि उत्पादकता वाढवून प्रगत उत्पादन क्षेत्राचे भविष्य घडविण्यात सरफेस इंजिनिअरिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा माझा विश्वास आहे. नावीन्यपूर्ण संशोधन, शाश्वतता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे अधिक स्मार्ट कोटिंग्ज आणि ऊर्जा कार्यक्षम प्रक्रिया विकसित करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अधिक दृढ सहकार्यामुळे स्वदेशी संशोधनाला गती देता येईल, उत्पादन क्षमता बळकट करता येईल आणि सरफेस इंजिनिअरिंग क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवून देता येईल.”
टेकएक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जे.व्ही.इंगळे म्हणाले, “भारताच्या सरफेस कोटिंग उद्योगात पुण्याने सुरुवातीपासूनच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उत्पादक, उद्योजक आणि तंत्रज्ञान पुरवठादारांचे भक्कम जाळे या शहरात आहे. प्रगत पेंट शॉप्स, ऑटोमेशन आणि उच्च कार्यक्षमतेच्या कोटिंग्जची वाढती मागणी या क्षेत्रासाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे, स्थानिकीकरणाला बळकटी देणे आणि उद्योगातील विविध घटकांना एकत्र आणणे यावर आपण भर दिला पाहिजे. यामुळे प्रगत कोटिंग सोल्युशन्स भारतीय उद्योजकांना अधिक परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध होतील आणि देशांतर्गत उद्योग व्यवस्था अधिक सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनेल.”




