डॉ. रत्नदीप जाधव म्हणाले, “या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार व दंतरोपण उपचारांवर चर्चा होणार आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच दंतचिकित्सेमध्येही सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान येत असते. त्याबाबत जास्तीत जास्त दंतवैद्यांना माहिती व्हावी यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये देश-विदेशातील ६०० ते ७०० दंतवैद्यक सहभागी होतील.”
डॉ. विजयकुमार ताम्हाणे म्हणाले, “या परिषदेत चारही दिवस चर्चासत्रांसह प्रात्यक्षिक कार्यशाळा होणार आहेत. दंतरोपणाच्या विविध प्रकारातील सद्यस्थिती आणि मुलभूत तत्वे, तात्पुरते उपचार व कायमस्वरुपी आदर्श वैद्यकीय उपचार, विविध उपचारांसाठी लागणारी उपकरणे यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. याशिवाय नियमित प्रॅक्टीस करणाऱ्या दंतवैद्यांना दैनंदिन क्लिनिकल प्रॅक्टिस करत असताना उद्भवणाऱ्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात येईल. दंतवैदयांबरोबरच रुग्णांना यांसारख्या परिषदांचा फायदा होतो. तंत्रज्ञानामुळे उपचार तर सोपे होतातच पण उपचारांदरम्यान होणाऱ्या मानवी चुकांना आळा बसण्यास मदत होते. तसेच कमी खर्चात उत्तम उपचार घेणे शक्य होते”





