पुणे, नोव्हेंबर २०२६ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी १५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील कल्याणी – भारत फोर्ज कारखान्याला भेट दिली. जगातील सर्वांत मोठा फोर्जिंग कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण बाबा कल्याणी यांनी या प्रसंगी अमित शहा यांचे स्वागत केले.
‘भारत फोर्ज’च्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमित शहा यांच्या हस्ते एका विशेष स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले. कंपनीची अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, नवनवीन संशोधन आणि देशाच्या उभारणीत दिलेले योगदान यांचा सहा दशकांचा प्रवास या स्मृतिफलकातून अधोरेखित करण्यात आला आहे.
या भेटीदरम्यान शहा यांनी कारखान्यातील फोर्जिंग विभागांची पाहणी केली. तसेच, कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रगतीबाबत त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारताची उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रातील क्षमता वाढवण्यात भारत फोर्जची भूमिका यावेळी चर्चेत आली. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘सशक्त भारत, सुरक्षित भारत’ या संकल्पनांच्या अनुषंगाने कंपनीचे योगदान यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘भारत फोर्ज’ची संपूर्ण मालकी असलेली संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) हिने भारतातच विकसित आणि तयार केलेल्या विविध उत्पादनांची माहितीही अमित शहा यांना देण्यात आली. या उत्पादनांमध्ये लहान शस्त्रे, तोफा, दारूगोळा यंत्रणा तसेच हवेत, जमिनीवर आणि पाण्यात काम करणाऱ्या मानवरहित यंत्रणांचा समावेश आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी कंपनी करीत असलेले प्रयत्न या उत्पादनांतून दिसून येतात.
‘उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स’साठी (यूपीएसटीएफ) तयार करण्यात आलेल्या ५.५६ x ४५ मिमी रायफल्सच्या पहिल्या रवानगीला अमित शहा यांच्या हस्ते या प्रसंगी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.





