Pune | October, 2026: ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आज महाराष्ट्रातील तळेगाव, पुणे येथील आपल्या अत्याधुनिक उत्पादन प्लांटच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा केली, जो भारतातील कंपनीच्या वाढीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
या प्लांटचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्वाटनप्रसंगी भारतासाठी कोरिया प्रजासत्ताकाचे राजदूत महामहीम ली सेओंग-हो; महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार; ह्युंडाई मोटर ग्रुपचे (एचएमजी) एक्झिक्युटिव्ह चेअर श्री. युसन चंग, एचएमजीचे व्हाईस चेअर श्री. जेहून चांग, ह्युंडाई मोटर कंपनीचे (एचएमसी) प्रेसिडंट व सीईओ श्री. होजे मुनोज आणि एचएमआयएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. तरुण गर्ग उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी, एचएमआयएलने 1999 पासून भारतातून 4 दशलक्ष प्रवासी वाहनांच्या एकत्रित निर्यातीची ऐतिहासिक कामगिरी देखील साजरी केली, याद्वारे भारताला जागतिक ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यातील कंपनीचे योगदान अधोरेखित केले. एकत्रितपणे, एचएमआयएल प्रवासी वाहनांची सर्वात मोठी निर्यातदार आणि भारतातून 4 दशलक्ष निर्यातीचा टप्पा गाठणारी पहिली ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ठरली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत जवळपास 10 दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री केली आहे, ज्यामधून भारतीय ग्राहकांमधील कंपनीची प्रबळ आणि निरंतर उपस्थिती दिसून येते.
भारतामधील उत्पादन क्षेत्रातील वाढीसाठी एचएमआयएलच्या बहुमूल्य योगदानाचे कौतुक करत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ह्युंडाई मोटर इंडिया’च्या पुणे प्लांटचे उद्घाटन आणि कंपनीने साध्य केलेली 4 दशलक्ष प्रवासी वाहनांची एकत्रित निर्यातीची कामगिरी जागतिक ऑटोमोटिव्ह उत्पादन केंद्र म्हणून भारताची वाढती ताकद दर्शवते. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, नाविन्यता, स्थानिकीकरण आणि कौशल्य विकासातील ह्युंडाईची सातत्यपूर्ण गुंतवणूक महाराष्ट्रातील आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि प्रबळ ऑटोमोटिव्ह परिसंस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल. आम्ही राज्य आणि देशाप्रती ह्युंडाईच्या दीर्घकालीन कटिबद्धतेचे स्वागत करतो. महाराष्ट्र सरकार ह्युंडाईच्या भविष्यातील वाढीच्या प्रवासाला पूर्ण पाठबळ देईल.”
जागतिक पातळीवर एचएमसीच्या सर्वात प्रगत उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून विकसित केलेला पुणे प्लांट इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान, एआय-सक्षम उत्पादन यंत्रणा, प्रगत गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रिया आणि पूर्णपणे एकात्मिक डिजिटल उत्पादन परिसंस्था एकत्र आणतो.
भारताविषयी ह्युंडाई मोटर ग्रुपच्या दीर्घकालीन दृष्टिकोनावर आपले मत व्यक्त करत एचएमजीचे एक्झिक्युटिव्ह चेअर श्री. युसन चंग म्हणाले, “भारत जागतिक पातळीवर ह्युंडाईची सर्वात महत्त्वाची आणि धोरणात्मक बाजारपेठ आहे. पुणे प्लांटचे उद्घाटन भारताच्या वाढीप्रती असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यावरील आमचा विश्वास दर्शवते. एचएमआयएलचा 4 दशलक्ष एकत्रित वाहनांच्या निर्यातीचा टप्पा भारतातील उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता सिद्ध करतो आणि ह्युंडाई मोटर ग्रुपच्या जगभरातील कामकाजात भारताची वाढती भूमिका अधोरेखित करतो.”
उत्पादनापलीकडे एचएमआयएल नवोन्मेष, संशोधन, इलेक्ट्रिफिकेशन आणि टॅलेंट विकासाच्या माध्यमातून भारताच्या भविष्यात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. शाश्वत मोबिलिटीच्या पुढील अध्यायाला आकार देण्यास मदत करण्यासाठी कंपनी उद्योग-शैक्षणिक भागीदारी, बॅटरी व विद्युतीकरण संशोधन उपक्रम आणि भविष्यातील मोबिलिटी प्रोग्राम्सच्या माध्यमातून भारतीय संस्था व भागीदारांसोबत काम करत आहे.
या टप्प्याचे धोरणात्मक महत्त्व आणि एचएमआयएलची भारताप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करत एचएमआयएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. तरुण गर्ग म्हणाले, “आमच्या पुणे प्लांटचे उद्घाटन भारतातील एचएमआयएलच्या वाढीच्या पुढील अध्यायाची सुरुवात दर्शवते. आम्ही या प्लांटमध्ये टप्प्याटप्प्याने 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करू. केवळ उत्पादन क्षमता वाढवण्यापलीकडे जाऊन हा प्लांट या प्रदेशातील औद्योगिक विकास, नवकल्पना आणि रोजगार निर्मितीला चालना देईल. या दृष्टिकोनाला पाठबळ देणारी प्रबळ प्रादेशिक पुरवठादार परिसंस्था आहे, ज्याद्वारे 55 पुरवठादार भागीदारांनी राज्यात आधीच जवळपास 4,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुसऱ्या श्रेणीतील व्हेंडर्ससह मिळून या परिसंस्थेने महाराष्ट्रात 18,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे हा प्रदेश एक महत्त्वाचे ऑटोमोटिव्ह उत्पादन केंद्र म्हणून पुढे येत असल्याच्या बाबीला पुष्टी मिळते. आम्ही भारतातील 30 वर्षे साजरी करत असताना आमचे ग्राहक, भागीदार आणि समुदायांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतात उत्पादन, गुंतवणूक आणि आर्थिक वाढीला सतत पाठबळ देणारी प्रगतीशील परिसंस्था तयार केल्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचे मनापासून आभार मानतो.”
पुणे प्लांटमध्ये प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासह एक अत्याधुनिक इंजिन शॉप देखील आहे, जे वाहनांच्या उत्पादनाला साहाय्य करण्यासाठी वार्षिक 150,000 इंजिन्स उत्पादित करते.
एचएमआयएलच्या पुणे उत्पादन प्लांटची ठळक वैशिष्ट्ये :
क्षमता विस्तार आणि भविष्यासाठी सज्जता
- सध्याची वार्षिक स्थापित उत्पादन क्षमता 170,000 युनिट्स.
- 2030 पर्यंत क्षमता 320,000 युनिट्सवर नेण्यासाठी टप्प्याटप्प्याने पुढील विस्तार.
- भविष्यात आयसीई आणि हायब्रिड उत्पादनासह अनेक मॉडेल्सना सामावून घेण्यास सक्षम असणाऱ्या लवचिक उत्पादन यंत्रणा.
- चेन्नईमधील ऑपरेशन्ससह मिळून एचएमआयएलची एकूण उत्पादन क्षमता 2030 पर्यंत वार्षिक जवळपास 1.14 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचेल.
स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0
- जागतिक पातळीवर एचएमसीच्या सर्वात प्रगत उत्पादन केंद्रांपैकी एक असलेला पुणे प्लांट इंडस्ट्री 4.0 तत्त्वांवर उभारण्यात आला आहे.
- ह्युंडाईच्या ई-फॉरेस्ट प्लॅटफॉर्मवर आधारित प्रगत डिजिटल फॅक्टरी वातावरण.
- प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, डिजिटल सिम्युलेशन्स आणि कर्मचाऱ्यांसाठी इमर्सिव्ह एआर-आधारित प्रशिक्षण.
एआय-आधारित ऑपरेशन्स
- गुणवत्ता, उत्पादन आणि देखभाल यांचा मेळ घालणारी एआय-सक्षम उत्पादन परिसंस्था.
- एआय-आधारित गुणवत्ता तपासणी आणि डिफेक्ट डिटेक्शन सिस्टम.
- एआय-सक्षम कर्मचारी सुरक्षा उपाययोजना.
- उत्पादन कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीसाठी एआय-आधारित विश्लेषण.
- उत्पादन, गुणवत्ता, पुरवठा साखळी आणि ग्राहक अनुभव या सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा वापर करण्याच्या एचएमआयएलच्या व्यापक आराखड्याचा भाग.
स्थानिकीकरण आणि पुरवठादार परिसंस्था
- प्रथम श्रेणीतील पुरवठादार परिसंस्थेने राज्यात आधीच जवळपास 4,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- पुण्यात कार्यरत असलेल्या 55 पुरवठादार भागीदारांचे पाठबळ मिळाले आहे.
- पुरवठादार सोर्सिंग नेटवर्कपैकी जवळपास निम्मे नेटवर्क प्लांटच्या 50-किलोमीटरच्या परिघात स्थित आहे.
- पुरवठादार परिसंस्थेने (प्रथम व द्वितीय श्रेणीमधील) राज्यात 18,000 हून अधिक रोजगार संधी निर्माण केल्या आहेत.
- प्रादेशिक उत्पादन क्षमता आणि पुरवठा साखळीची स्थिरता अधिक दृढ केली आहे.
कर्मचारी-केंद्रित मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस
- आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास पायाभूत सुविधा.
- कर्मचाऱ्यांसाठी प्रगत एआर-सक्षम प्रशिक्षण यंत्रणा.
- वैद्यकीय केंद्र, कर्मचारी कल्याण सुविधा आणि मनोरंजन पायाभूत सुविधा.
- कर्मचारी-केंद्रित कामाच्या ठिकाणाच्या डिझाइनसाठी प्रतिष्ठित 2026 रेड डॉट पुरस्काराने सन्मानित, ज्यामधून कर्मचाऱ्यांचे कल्याण, सहयोग आणि नाविन्यता यांवरील ह्युंडाईचा भर दिसून येतो.
- सुरक्षित, सहयोगात्मक आणि भविष्यासाठी सज्ज कामाच्या वातावरणाला पाठबळ देण्यासाठी डिझाइन केलेले.
भारताच्या भविष्यातील मोबिलिटी परिसंस्थेला चालना
- संशोधन, नाविन्यता आणि इलेक्ट्रिफिकेशनमधील एचएमजीच्या वाढत्या गुंतवणुकीचे पाठबळ.
- भारतातील सात अग्रगण्य संस्थांमध्ये पसरलेले उद्योग-शैक्षणिक सहयोग नेटवर्क.
- बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिफिकेशन आणि भविष्यातील मोबिलिटी सोल्युशन्सवर केंद्रित असलेले सुमारे 40 सुरू असलेले संशोधन प्रकल्प.
- भारताच्या शाश्वत मोबिलिटीकडील संक्रमणात आणि भविष्यातील ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान.
ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामाजिक प्रभावाला चालना
- आयोनिक फॉरेस्टच्या माध्यमातून 1 दशलक्षहून अधिक झाडांची लागवड; पाच वर्षांत अंदाजे 63,000 टन कार्बन डायऑक्साईड कमी करण्याचे उद्दिष्ट.
- स्पर्श संजीवनी उपक्रमाद्वारे 50,000 हून अधिक ग्रामीण रहिवाशांना फायदा; होप4कॅन्सर’द्वारे (Hope4Cancer) 20 तपासणी शिबिरांच्या माध्यमातून 2,000 हून अधिक व्यक्तींसाठी कर्करोगाचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक काळजी शक्य केली.
- प्रोजेक्ट एच2ओपीई (Project H₂OP) ‘द्वारे 120,000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
- कौशल्य विकास आणि कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून 150,000 हून अधिक नागरिकांचे सक्षमीकरण; संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कल्याणकारी योजनांचे जवळपास 300 कोटी रुपयांचे लाभ मिळवून दिले.
एचएमआयएल भारतात 30 वर्षे साजरी करत असताना पुणे प्लांट नाविन्यता, स्थानिकीकरण, निर्यात आणि शाश्वत मोबिलिटीच्या कंपनीच्या प्रवासातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे, ज्यामुळे भारताच्या वाढीच्या वाटचालीप्रती कंपनीची दीर्घकालीन कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित होते.




