पुणे -आधार समाजसेवा संस्था, विंगर परिवार आणि टाटा मोटर्सच्या सी.एस.आर उपक्रमांतर्गत समाजातील निराधार व गरजू घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने निगडी प्राधिकरण येथील सुवर्ण नगरी वृद्धाश्रमात मदतकार्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून वृद्धाश्रमाला किराणा साहित्य, वॉशिंग मशीन, डायपर, टॉवेल असे लाखो रुपयांच्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पुरुषोत्तम बाबर म्हणाले,“समाजसेवा ही केवळ मदत करण्यापुरती मर्यादित नसून गरजू व्यक्तीला आपण त्याच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देणे ही खरी समाजसेवा आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योगदान दिले आहे. जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना आधार, आपुलकी आणि सन्मान मिळणे ही समाजाची जबाबदारी आहे.”
यावेळी बोलताना विंगर परिवाराचे कुटुंब प्रमुख संजय वाकचौरे म्हणाले, “टाटा मोटर्स केवळ वाहने तयार करणारी संस्था नाही, तर समाजातील उपेक्षित, वंचित आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेणारी संस्था आहे. समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”
कार्यक्रमास कुटुंब प्रमुख संजय वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी मनोज गाडगे, धनंजय शहाणे, सुनील कासार, संतोष गाडे, रविंद्र लामसे, अरबाज तांबोळी, श्रुतिका साळवी, अमेय सर, सुवर्ण नगरी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका रश्मी झेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन कोरडे, रघुनाथ फेगडे, धनंजय साळुंके, चंद्रकांत पवार, आण्णा नलवडे, अविनाश आवटे, विष्णू शिंदे आणि किशोर जैन यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संयोजन अनिल तळेकर, सतीश काळभोर, किरण बोरगे आणि पुरुषोत्तम बाबर यांनी केले. प्रास्ताविक सुनील कासार यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महंमदशरीफ मुलाणी यांनी केले.





