पुणे, ५ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (एम.सी.ई.सोसायटी), आझम कॅम्पस येथे आज राजस्थानच्या मा. राज्यपाल महोदय आदरणीय श्री हरिभाऊ किसनराव बागडे यांचा विशेष दौरा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. पाशा पटेल साहेब उपस्थित होते.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील आझम कॅम्पसच्या योगदानाचा पट याप्रसंगी मांडण्यात आला. त्यानंतर एम.सी.ई.सोसायटी आणि युनिव्हर्सिटीच्या वतीने मा. आबेदा इनामदार यांच्या हस्ते राजस्थानच्या महामहीम राज्यपाल महोदयांचा पारंपरिक पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, विशेष पाहुणे मा. पाशा पटेल साहेब यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात आदरणीय राज्यपाल महोदयांनी पालिकेच्या शाळांमधील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना संगणक, कोडिंग व रोबोटिक्सचे मोफत आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्याच्या आझम कॅम्पस व डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या या डिजिटल क्रांती उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. औपचारिक परीक्षांच्या पलीकडे जाऊन, राज्यपालांनी व्यावसायिक तयारी आणि स्वावलंबनावर गांभीर्याने भर दिला. “व्यावहारिक कौशल्ये आत्मसात केल्यामुळे स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे व्यक्तींना रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करता येतात,” असे माननीय राज्यपाल म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की, तरुण पिढीमध्ये आर्थिक लवचिकता वाढवण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती कौशल्ये ही अत्यंत महत्त्वाची आहेत.
मा. पाशा पटेल साहेब यांनी उपस्थितांना संबोधित करताना तरुणांना मोलाचा संदेश दिला. “आजच्या युवा पिढीने व विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राशी निगडित विविध प्रकल्प, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तरुणांच्या ऊर्जेतून आणि कृषी विकासातूनच मजबूत राष्ट्रउभारणी शक्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
हा सोहळा एम. सी. ई. सोसायटीच्या अध्यक्ष तथा डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती आदरणीय आबेदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मा. आबेदा इनामदार मॅडम यांनी मा. राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संस्था यापुढेही शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध राहील, असा पुनरुच्चार केला.





