‘बापूं’च्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणे हीच खरी सुमनांजली : गोपाळदादा तिवारी

By: Editor_Manas

On: Friday, October 2, 2026 3:56 PM

Google News
Follow Us

पुणे, दि. २ ऑक्टोबर : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिकता म्हणून कार्यक्रम घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आणि नैतिक मूल्यांचे आचरण करून लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तिवारी यांनी महात्मा गांधींच्या विचारांची आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी सांगड घालत त्यांच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज अधोरेखित केली.

महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य आणि नैतिकता या मूल्यांच्या आधारावर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर भारतात राजेशाही पद्धतीऐवजी लोकशाहीच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती व्हावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते प्रत्यक्ष जीवनात आणि राज्यकारभारात उतरविणे आवश्यक आहे, असे तिवारी यांनी सांगितले.

“तत्त्वांशिवाय राजकारण” हे महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांपैकी एक असल्याचे नमूद करत तिवारी म्हणाले की, राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी असले पाहिजे. लोकशाही मूल्ये आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेणे ही राजकारण्यांसह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

दरम्यान, लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि नैतिकतेचाही तिवारी यांनी विशेष उल्लेख केला. पंतप्रधान होण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सार्वजनिक जीवनातील जबाबदारी आणि नैतिकतेचा हा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांसाठीही मार्गदर्शक ठरावा, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली.

गांधी आणि शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती आणि औपचारिक कार्यक्रमांचे स्वागत करतानाच, त्यांच्या विचारांनुसार लोककल्याणकारी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने प्रत्यक्ष कृती होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now