‘कॉकरोच जनता पार्टी’चे जेल भरो आंदोलन; गांधीजींच्या प्रतिमांचे टी-शर्ट घालून…

By: Editor_Manas

On: Friday, October 2, 2026 3:03 PM

Google News
Follow Us

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने शुक्रवारी (२ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘जेल भरो आंदोलन’ केले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना तिरंगा तसेच महात्मा गांधींच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले होते. आंदोलन शांततेत करण्याचे आणि पोलिसांशी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली आहे.

शिवाजी पार्क येथे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मैदानावरील निर्बंध, वाहतूक आणि ध्वनिप्रदूषणाच्या शक्यतेचा पोलिसांनी संदर्भ दिला होता. मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्याची भूमिका सीजेपीने घेतली. त्यानंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग करण्यात आले.

दरम्यान, “मुंबई फक्त ट्रेलर आहे, फायनल दिल्लीत होईल” असा दावा पक्षाकडून करण्यात आला असून, आंदोलन देशातील इतर शहरांमध्येही नेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now