आठ दिवस घाण काढून घेतली; आज कामावरून कमी केले; धायरीतील ४० हून अधिक महिला व तरुण कामगारांचा ठेकेदारावर गंभीर आरोप; न्यायाची मागणी

By: Editor_Pratik

On: Friday, August 21, 2026 6:13 AM

Google News
Follow Us

पुणे : पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत धायरी येथील धारेश्वर आरोग्य कोठी परिसरात काम करणाऱ्या सुमारे ४० हून अधिक गरीब, गरजू महिला व बेरोजगार तरुणांवर अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मागील आठ दिवसांपासून परिसरातील साचलेली घाण, कचऱ्याचे ढीग उचलण्याचे काम करून घेतल्यानंतर अचानक कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, मागील आठ दिवसांपासून त्यांच्याकडून नियमितपणे परिसरातील कचरा व घाण साफ करून घेतली जात होती. दररोज हजेरी घेतली जात होती, तसेच काम करतानाचे फोटोही काढून पाठवले जात होते. त्यामुळे आपल्याला नियमित रोजगार मिळेल, या आशेने महिला व तरुण कामगार काम करत होते.

मात्र, आज सकाळी हे कामगार नेहमीप्रमाणे कामावर गेले असता त्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या जागी नवीन कामगार घेण्यात आल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. त्यामुळे आठ दिवस काम करूनही रोजगार गमावल्याने या कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कचरा उचलण्याचे काम सिद्धिविनायक कार्पोरेट या कंपनीकडे असल्याचे संबंधित कामगारांनी सांगितले. आठ दिवस काम करून घेतल्यानंतर अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“दुसरे कामगारच घ्यायचे होते, तर आमच्याकडून आठ दिवस काम का करून घेतले? मोठ्या प्रमाणावर साचलेली घाण साफ करून घेण्यासाठी आमचा वापर करून नंतर कामावरून कमी करण्यात आले का?” असा संतप्त सवाल या कामगारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कचरा व्यवस्थापनाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली जात असताना प्रत्यक्ष कचरा साफ करणाऱ्या गरीब महिला व बेरोजगार तरुणांच्या रोजगाराची मात्र कोणतीही हमी राहिलेली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

मोठ्या आशेने कामावर आलेल्या महिला व तरुणांना अचानक रोजगारापासून वंचित करणे योग्य नसून, या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने चौकशी करून संबंधित कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. आठ दिवस काम घेतलेल्या कामगारांच्या हजेरीची नोंद, कामाचे फोटो आणि त्यांना देय असलेली मजुरी याबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 21, 2026

August 21, 2026

August 21, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026