मुंबई : दूध आणि अन्य अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेल विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, राज्यातील कोणत्याही दुकानदाराला सुटे खाद्यतेल विकता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून सुट्टे तेल विक्री सुरू ठेवल्यास संबंधित विक्रेत्यांवर FDAकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खाद्यतेल विक्रेत्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रीसंदर्भात एक नवा ‘अंमलबजावणी आदेश’ जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार, आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पॅकिंग नसलेले किंवा उघड्यावर मिळणारे सुट्टे तेल आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते आणि त्यात भेसळीची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे जनआरोग्याच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरातील कोणत्याही दुकानदाराला ग्राहकांना सुट्टे तेल विकता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करून जर कोणी दुकानदार सुट्टे तेल विकताना आढळला, तर त्याच्यावर थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. एफडीएच्या या निर्णयामुळे खाद्यतेलातील भेसळीला मोठा आळा बसेल आणि ग्राहकांना दर्जेदार व सुरक्षित तेल मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मात्र या निर्णयामुळे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी मागील वर्षभरात केलेल्या कारवाईची धक्कादायक आकडेवारी समोर ठेवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या वर्षी आम्ही राज्यभरातून खाद्यतेलाचे एकूण १,२४७ नमुने तपासणीसाठी घेतले होते. यापैकी १,१४२ नमुने प्रमाणित आढळले.
मात्र, ७७ नमुने निकृष्ट दर्जाचे (Sub-standard), १३ नमुने आरोग्यासाठी असुरक्षित (Unsafe), तर १५ नमुने चुकीचे ब्रँडिंग (Misbranded) असलेले आढळून आले.”
गतवर्षी तब्बल ५ कोटी ३१ लाखांचे निकृष्ट तेल जप्त
या धडक कारवाईत प्रशासनाने राज्यभरातून खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला. “या कारवाईदरम्यान आम्ही तब्बल ३ लाख २० हजार ७८१ किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत ५ कोटी ३१ लाख रुपये इतकी होती. मागील वर्षाच्या या आकडेवारीवरून आणि निष्कर्षांवरूनच आम्ही आता कारवाईचा वेग अधिक वाढवला आहे,” अशी माहिती मुंढे यांनी दिली.
नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत मुंढे यांनी नव्या नियमांची गरज स्पष्ट केली. “ही नवी ‘कम्प्लायन्स ऑर्डर’ (अंमलबजावणी आदेश) म्हणजे याच दिशेने टाकलेले पुढचे आणि अत्यंत कडक पाऊल आहे. लोकांना मिळणारे खाद्यतेल हे चुकीच्या ब्रँडिंगचे, असुरक्षित किंवा निकृष्ट दर्जाचे नसावे; ते पूर्णपणे सुरक्षित असावे, यासाठी या नियमांची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे,” असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.





