पुणे : अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. नऱ्हे येथील एका फरसाण दुकानात तळलेल्या वाटाण्यांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी ६८ किलो वजनाचा व ७,४८० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
कारवाईतील ठळक मुद्दे
- खेड व आंबेगाव तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई
- एकूण १९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त
- नऱ्हे येथे कृत्रिम रंग मिसळलेले ६८ किलो तळलेले वाटाणे जप्त
- मंचरमध्ये गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळला
- दोन जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन आस्थापनांवर कारवाई
मंचरमध्ये प्रतिबंधित पदार्थांचा साठा
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस आणि समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर यांच्या मागील गोदामांमध्ये ३०,३९५ रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याचे आढळले. संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० लाखांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त
मंचर येथील खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रा. लि. ही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. येथे विक्रीसाठी ठेवलेला मैदा, बेसन, आटा आणि इतर अन्नपदार्थांचा १०.४९ लाख रुपये किमतीचा व १९,८८६ किलो वजनाचा साठा नमुना तपासणीसाठी जप्त करण्यात आला.
सुपारी उत्पादकावरही कारवाई
खेड तालुक्यातील उज्ज्वल सुपारी या आस्थापनेत विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. तसेच सुपारीचा साठा अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून ८.१६ लाख रुपये किमतीचा १,८९८ किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आला.
तुकाराम मुंढे यांच्या कार्यभारानंतर कारवायांना वेग
एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर विभागाने भेसळखोरांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे विभागाचे सहआयुक्त दिगांबर भोगावडे यांनी ही माहिती दिली.
अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजित झोडगे, आदित्य जोशी, संकेत सूर्यवंशी तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे आणि प्रदीप आंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





