पुण्यात ‘द डिस्टिंग्विश्ड जेंटलमन्स राईड’चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; पुरुषांच्या आरोग्य जनजागृतीसाठी २८० रायडर्सचा सहभाग

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 3:39 PM

Google News
Follow Us

पुणे, प्रतिनिधी : पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे तसेच प्रोस्टेट कॅन्सर संशोधनासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘द डिस्टिंग्विश्ड जेंटलमन्स राईड’ (DGR) स्नेहमेळावा नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. पाषाण येथील ट्रायम्प – बी.यू. भंडारी मोटारसायकल शोरूमपासून सुरू झालेल्या या काकर्यक्रमाचा समारोप कल्याणी नगर येथील ‘कायरोस रेस्टॉरंट’मध्ये झाला.

जगभरात एकाच दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील तब्बल २८० रायडर्स सहभागी झाले होते. क्लासिक आणि कस्टम मोटारसायकलींसह रायडर्सनी आकर्षक ‘डॅपर’ पेहरावात सहभाग नोंदवत शहरातील विविध भागांतून एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. पुरुषांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याबरोबरच जबाबदार आणि शिस्तबद्ध मोटरसायकलिंगचा संदेशही या राईडमधून देण्यात आला.

‘द डिस्टिंग्विश्ड जेंटलमन्स राईड’ या जागतिक उपक्रमाची सुरुवात २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मार्क हव्वा यांनी केली. ‘Mad Men’ मालिकेतील डॉन ड्रेपर या पात्रापासून प्रेरणा घेत ही संकल्पना साकारण्यात आली. आज हा उपक्रम ११५ देशांपर्यंत पोहोचला असून आतापर्यंत ३ लाख ४० हजारांहून अधिक रायडर्सनी सहभाग घेत ३.१६ कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक निधी उभारला आहे.

पुण्यातील कार्यक्रमाचे आयोजन ‘डीजीआर २०२६ होस्ट आणि रेडॉन रायडर्सचे संस्थापक’ डॉ. किशोर शिंदे, ट्रायम्प – बी.यू. भंडारीचे राजेश वर्मा तसेच डीजीआर २०२६ होस्ट व रेडॉन रायडर्स कोअर कमिटी सदस्य ॲड. नरेश शेळके यांनी केले. बजाज इंडियाच्या रितिका लहिरी यांनी मोटरसायकलिंग आणि डीजीआर संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना व माहिती दिल्यानंतर पाषाण येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाचे अधिकृत मीडिया पार्टनर रेड एफएम ९८.३ होते. रेड एफएमचे आरजे बंड्या यांनी उपस्थित राहून रायडर्सशी संवाद साधला. कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून सच्चिदानंद मेंटल हेल्थ अँड काउन्सलिंग सेंटरचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न फुटाणे आणि ‘श्री बाईक पॉइंट’चे इंजिनिअर प्रसाद बापट उपस्थित होते.

डॉ. प्रसन्न फुटाणे यांनी मानसिक आजार, नैराश्य, त्यामागील कारणे आणि उपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच इंजिनिअर प्रसाद बापट यांनी उन्हाळा आणि पावसाळ्यात मोटारसायकलची काळजी, देखभाल आणि नियोजन यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली.

उन्हाळ्याच्या कडक उष्णतेतही सर्व २८० रायडर्सनी संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट शिस्त, सुरक्षितता आणि उत्साह कायम राखला. दरवर्षी मे महिन्यातील रविवारी जगभरात एकाच दिवशी होणारा हा कार्यक्रम २०२६ मध्ये विशेषतः १७ मे रोजी आयोजित करण्यात आला. यंदा डी.जी.आर.ने आपल्या १५व्या वर्षात पदार्पण केले असून फॅशनेबल पेहराव, क्लासिक मोटारसायकली आणि पुरुषांच्या आरोग्यासाठीची एकजूट हाच या उपक्रमाचा खरा आत्मा ठरला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now