पुणे : MSD इंडियाने अभिनेत्री Madhuri Dixit यांच्या सहकार्याने देशभरात सर्वाइकल कॅन्सर जागरूकता मोहीम सुरू केली आहे. महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्याविषयी संवाद वाढवणे आणि सर्वाइकल कॅन्सर तसेच त्याच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध आरोग्य पर्यायांबाबत डॉक्टरांशी चर्चा करण्यास महिला व पालकांना प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वाइकल कॅन्सर हा एक गंभीर आणि सामान्य आजार मानला जातो. मात्र, वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि योग्य प्रतिबंधात्मक उपायांमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. तरीदेखील, ग्लोबोकॅन एचपीव्ही इंडिया रिपोर्ट 2023 नुसार देशात दर सात मिनिटांनी जवळपास एका महिलेचा सर्वाइकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव आणि आरोग्य तपासणीकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांकडे मोहीम विशेष लक्ष वेधते.
या उपक्रमांतर्गत माधुरी दीक्षित यांच्या सहभागातून विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर लघु माहितीपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये सर्वाइकल कॅन्सर, त्याचा मानव पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) याच्याशी असलेला संबंध आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे महत्त्व याविषयी सोप्या व माहितीपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच महिलांनी आणि पालकांनी स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत योग्य माहिती घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना एमएसडी इंडिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक ब्रेख्त वॅनेस्टे यांनी सांगितले की, सर्वाइकल कॅन्सरबाबत जागरूकता वाढवणे आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत माहिती वाढल्यास महिलांच्या दीर्घकालीन आरोग्यात सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी माधुरी दीक्षित म्हणाल्या की, महिला अनेकदा कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सर्वाइकल कॅन्सरसारख्या आजारांबाबत योग्य माहिती आणि जागरूकता अत्यंत आवश्यक असून, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत डॉक्टरांशी खुलेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. या मोहिमेमुळे अधिकाधिक महिला आणि कुटुंबांना आरोग्यविषयक निर्णय वेळेत घेण्याचा आत्मविश्वास मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिबंध, जनजागृती आणि माहितीपूर्ण आरोग्य निर्णय यांना प्रोत्साहन देत महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी व्यापक सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांना हातभार लावण्याचा एमएसडीचा या मोहिमेमागील उद्देश आहे.





