ससून परिसरात डीजेचा दणदणाट; शांतता क्षेत्र नियमांचे उल्लंघन, उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 14, 2026 5:16 PM

Google News
Follow Us

पुणे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’चा निर्णय घेतला असतानाही ससून रुग्णालय परिसरात मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. शांतता क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या या भागात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे.

ससून रुग्णालय परिसरात डीजेचा आवाज तब्बल १२४ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचा दावा समितीने केला आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाला सलग तीन दिवस लेखी निवेदने देऊनही कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“शांतता क्षेत्रात अशा प्रकारे डीजेचा दणदणाट होणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ आहे. पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले,” असे डंबाळे यांनी म्हटले आहे.

ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिलेली असताना त्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, याबाबतचे पुरावे आणि तक्रारींच्या प्रतीसह प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now