प्रतिनिधी – मानस : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षातील तीन बंडखोर आमदार १४ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह, गोसाईगंजचे आमदार अभय सिंह आणि कालपीचे आमदार विनोद चतुर्वेदी यांचा भाजप प्रवेश अमेठीतील कार्यक्रमात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या तिन्ही आमदारांनी २०२४च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले होते. त्यानंतर त्यांचा समाजवादी पक्षाशी दुरावा वाढला. आता १४ ऑक्टोबरला ते औपचारिकरीत्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राकेश प्रताप सिंह यांचा निर्णय
गौरीगंज मतदारसंघाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी स्वतः १४ ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. गौरीगंज येथील त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राकेश प्रताप सिंह हे गौरीगंजमधून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी समाजवादी पक्ष सोडण्यामागे पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत मतभेद असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर गौरीगंज मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.
दोन आमदारही सोबत
अयोध्येतील गोसाईगंज मतदारसंघाचे आमदार अभय सिंह आणि जालौनमधील कालपी मतदारसंघाचे आमदार विनोद चतुर्वेदी हे देखील राकेश प्रताप सिंह यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन्ही आमदारांनीही १४ ऑक्टोबरच्या पक्षप्रवेशाची पुष्टी केली आहे.
२०२७च्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग
उत्तर प्रदेशमध्ये २०२७मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच पक्षांतराच्या या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तीन बंडखोर आमदारांचा भाजप प्रवेश हा समाजवादी पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय घटनाक्रम ठरत आहे.





