महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातुन जाणारा आणखी एक महत्वाचा महामार्ग चौपदरी होणार ! ३ जिल्ह्यांना होणार फायदा

अहिल्यानगर : महाराष्ट्रातील आणखी एका राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील हजारो किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्यात आले आहे.

तसेच काही नवीन महामार्गांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. अशातच आता महाराष्ट्रातून जाणाऱ्या एका नव्या महामार्गाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय झाला असल्याची समजते.

यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असणाऱ्या सापुतारा या हिल स्टेशनला जाणे सोयीचे होणार आहे. कारण की, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने नाशिक जिल्ह्यातील वणी ते गुजरातमधील सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पासाठी भूसंपादनाची अंतिम अधिसूचना सुद्धा जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. यातील पहिला टप्पा हा वणी ते हातगड असा राहील. पहिल्या टप्प्यात सुमारे १७ किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सापुतारा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.

सध्या वणी ते हातगड हा मार्ग दुहेरी व घाटाचा असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय होत आहे. चौपदरीकरणामुळे या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील.
तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हा रस्ता भविष्यातील वाहतूक भार पेलण्यास सक्षम ठरणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळांना जोडणारा हा मार्ग वेळ आणि खर्चाची बचत करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते वणी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली आहे.

त्यामुळे सिंहस्थपूर्व काळातच नाशिक ते सापुतारा हा संपूर्ण मार्ग अधिक सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने २०२४ मध्ये भूसंपादनाची प्राथमिक नोटीस काढून हरकती मागविल्या होत्या.

मात्र, कोणतीही हरकत न आल्याने आता अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या महामार्गाचा लाभ केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता धुळे व नंदुरबार जिल्ह्यांनाही होणार आहे.

धुळे-मालेगाव मार्गे नाशिक आणि पुढे वणी येथे या चौपदरी महामार्गाशी वाहने जोडली जातील, तर नंदुरबार जिल्ह्यातून शहादा-धुळे-मालेगाव मार्गे येणाऱ्या वाहनांना सापुतारा, हातगड व नाशिककडे जाण्यासाठी सुरक्षित पर्याय मिळेल. गुजरातकडून सापुतारा-हातगड मार्गे येणारी वाहतूकही या महामार्गाला जोडली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे पर्यटन, व्यापारी आणि कृषी मालवाहतूक वाढण्यास चालना मिळणार असून, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.