Video : मतदानादरम्यान ईव्हीएमला हळद-कुंकवाने पुजा आणि आरती; पुण्यातील भोरमध्ये धक्कादायक प्रकार

Video: मतदानादरम्यान ईव्हीएमला हळद-कुंकवाने पुजा आणि आरती; पुण्यातील भोरमध्ये धक्कादायक प्रकार

पुणे : राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज, मंगळवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र निवडणूक प्रचार थांबल्यानंतर नागरिक सकाळपासून मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. पुणे जिल्ह्यातील १२ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायती मिळून आतापर्यंत ८.३७ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. काही ठिकाणी मतदानाची गती कमी असली, तरी काही भागात चांगला उत्साह दिसून येत आहे.

याच दरम्यान भोर नगरपरिषदेतील एका मतदान केंद्रावरून नियमबाह्य प्रकार समोर आला आहे. मतदानावेळी ईव्हीएम मशीनची हळद-कुंकवाने पुजा आणि आरती केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. या कृत्यामुळे निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर भोरच्या मतदान केंद्रावरील केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात आली असून, त्या मतदान केंद्रावर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तातडीची पावले उचलली आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत मिळून ८.३७ टक्के मतदान झाले आहे. तब्बल आठ-दहा वर्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदार, उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील मतदार कोणाला मतदान करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.