पुणेकरांसाठी धक्कादायक निर्णय! सातनंतर पेट्रोल पंप बंद – का घ्यावा लागला हा निर्णय?

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संध्याकाळी ७ नंतर सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

असोसिएशनने याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवत परिस्थितीची माहिती दिली होती. पत्रात वाढत्या हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, कठोर कारवाई न झाल्यास पेट्रोल पंपांच्या सेवा वेळेत बदल करावा लागेल, असा इशारा देण्यात आला होता.

असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला म्हणाले, “पुण्यात पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. पोलिसांनी योग्य पावले उचलली नाहीत, तर आम्ही पंप फक्त संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवू. त्यानंतर एक थेंबही पेट्रोल मिळणार नाही, याची सूचना आम्ही प्रशासनाला दिली आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले, “पेट्रोल पंप ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्हालाही पंप बंद करणे हा शेवटचा पर्याय आहे. मात्र प्रशासनाने सुरक्षा वाढवून कर्मचाऱ्यांचे रक्षण करावे, अशी आमची अपेक्षा आहे. आयुक्त अमितेश कुमार निश्चितच यावर उपाय शोधतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

या निर्णयामुळे संध्याकाळी ७ नंतर पुणेकर वाहनचालकांची मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे.