जन्मकुंडली केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
पणजी – तुमच्या जीवनाचा खरा अर्थ काय? जीवनाची सार्थकता कशात आहे ? आध्यात्मिक उन्नतीसाठी कोणता मार्ग निवडावा? आदी प्रश्न हे मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनाशी संबंधित आहेत. यांसारख्या गहन प्रश्नांची उत्तरे तुमच्या जन्मकुंडलीतून मिळू शकतात. ज्योतिषशास्त्र केवळ शिक्षण, विवाह किंवा व्यवसायासारख्या व्यावहारिक गोष्टींपुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही स्पष्ट करू शकते, असा निष्कर्ष ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांनी मांडला. नुकतेच गोवा येथे ‘जयसिंगराव चव्हाण ११ व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते त्या अधिवेशना’त ते बोलत होते.
या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते.‘जन्मकुंडली – जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’ या शोधनिबंधाचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून, लेखक श्री. राज कर्वे हे आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २० राष्ट्रीय आणि १०१ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १२१ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी श्री. राज कर्वे यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शवण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते. जन्मकुंडलीत असणार्या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो; कुणी भक्तीद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, कुणी कर्माद्वारे तर कुणी सेवेद्वारे अध्यात्मात प्रगती करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन देण्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. राज कर्वे यांनी या अधिवेशनात केले.








